Mumbai MLA hostel water crisis: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना मुंबईतील आमदार निवासातच गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याचा एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये भांडी धुवायलाही पाणी नसल्यामुळे लोकप्रतिनिधींना चक्क कागदी प्लेटमध्ये जेवण वाढण्याची वेळ आली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर एक व्हिडिओ पोस्ट करत महायुती सरकारवर जोरदार टीका केलीय.
काय आहे प्रकरण?
विजय वडेट्टीवार यांनी आमदार निवासातील गैरसोयींचा पाढा वाचताना सरकारच्या नियोजनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या सरकारला लोकप्रतिनिधी राहत असलेल्या आमदार निवासातील पाण्याचे साधे नियोजन करता येत नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
कॅन्टीनमध्ये पाणीच नसल्याने तिथे कागदी प्लेट्स वापरल्या जात आहेत. महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे मोठे सावट आहे, धरणांतील पाणीसाठा अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला असून शहरांमध्येही मोठी पाणीकपात सुरू झाली आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )
लोकप्रतिनिधी फोडण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी
महायुती सरकारवर हल्लाबोल करताना वडेट्टीवार म्हणाले की, एकीकडे राज्यातील सामान्य जनतेला पाण्याचा एक थेंब मिळणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे हे सरकार मात्र आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्यात व्यस्त आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. सत्ताधारी आमदार आता पाण्यासाठी टॉवेलवर जाऊन मारामारी करणार आहेत का, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
मंत्र्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकारणात रस
राज्यातील मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना विजय वडेट्टीवार यांनी जलसंपदा मंत्र्यांवरही निशाणा साधला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री नाशिक विधानपरिषदेच्या घोडेबाजारात व्यस्त होते आणि उरलेले मंत्री पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यापेक्षा विरोधकांचे लोकप्रतिनिधी पळविण्यात मग्न आहेत, असा आरोप त्यांनी केला. जनतेला सध्या सत्तेचा हा घाणेरडा खेळ नको असून पिण्यासाठी पाणी हवे आहे. त्यामुळे हे राजकारण तातडीने थांबवा आणि महाराष्ट्राच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.