Ashwini Bhide: मुंबई महापालिकेचा 150 वर्षांचा इतिहास बदलणाऱ्या अश्विनी भिडे कोण आहेत? 'या' मोठ्या कामामुळे ओळख

Who is Ashwini Bhide?: आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
IAS Ashwini Bhide : अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत.
मुंबई:

 Ashwini Bhide  First Female Commissioner of BMC: मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात आता एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिकेच्या 150 वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याकडे हे अत्यंत महत्त्वाचे पद सोपवण्यात आले आहे. मावळते आयुक्त भूषण गगराणी यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज ते निवृत्त होत असून, त्यांच्या जागी अश्विनी भिडे आता मुंबईचा कारभार सांभाळणार आहेत.

कोण आहेत अश्विनी भिडे?

अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील असणाऱ्या भिडे यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 9 वा क्रमांक पटकावला होता, तर महिला उमेदवारांमध्ये त्या देशात पहिल्या आल्या होत्या. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही उत्तर आहे. 

Advertisement

अश्विनी भिडे यांनी  इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली असून त्यांच्याकडे एमबीएची पदवी देखील आहे. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात कोल्हापूरमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले, जिथे त्यांच्या जलव्यवस्थापन आणि ग्रामीण विकासातील कामाची मोठी दखल घेतली गेली.

( नक्की वाचा : IAS Ashwini Bhide : मुंबई महापालिकेला मिळाल्या नव्या कारभारी; अश्विनी भिडे यांच्या खांद्यावर मुंबईची धुरा! )

मुंबईची 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख

मुंबईच्या वाहतूक कोंडीवर जालीम उपाय मानल्या जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये अश्विनी भिडे यांचे योगदान मोलाचे आहे. 2015 ते 2020 या काळात त्यांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या अत्यंत गुंतागुंतीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेच्या कामात त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आजही चर्चेत असतात. 

आरेमधील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून झालेल्या वादात त्यांनी अत्यंत ठामपणे आपली आणि प्रशासनाची भूमिका मांडली होती. त्यांच्या याच कामामुळे त्यांना मुंबईची 'मेट्रो वुमन' म्हणून ओळखले जाते.

संकट काळातील अनुभवाचा फायदा

अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचा अनुभव नवा नाही. कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्या काळात त्यांनी राबवलेली आरोग्य व्यवस्था आणि रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याची पद्धत (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) याचे मोठे कौतुक झाले होते. 

Advertisement

सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आणि अनुभवी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

अशी झाली आयुक्त पदासाठी निवड

मुंबई महापालिकेच्या या सर्वोच्च पदासाठी संजय मुखर्जी, असीम गुप्ता आणि अश्विनी भिडे यांची नावे चर्चेत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्विनी भिडे यांच्या नावासाठी आग्रही भूमिका घेतली होती. वर्षा बंगल्यावर झालेल्या वरिष्ठ स्तरावरील बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. अनेक ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना मागे सारून भिडे यांची या पदावर झालेली नियुक्ती प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Advertisement

प्रशासनातील महिला सक्षमीकरणाचा संदेश

अश्विनी भिडे यांची नियुक्ती ही केवळ प्रशासकीय बदल नसून तो महायुती सरकारकडून दिला गेलेला एक मोठा संदेश मानला जात आहे. यापूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आणि सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता मुंबई महापालिकेचे नेतृत्वही एका महिला अधिकाऱ्याकडे देऊन सरकारने महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर महिलांना संधी देण्याचे आपले धोरण स्पष्ट केले आहे.
 

Topics mentioned in this article