PMC Mayor: पुण्याच्या नव्या महापौर मंजुषा नागपुरे कोण आहेत? अजित पवारांच्या शब्दानं कसं बदललं संपूर्ण गणित

PMC Mayor News : पुणे महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागून 2 आठवडे उलटल्यानंतर अखेर शहराला नवा कारभारी मिळाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Manjusha Nagpure Pune Mayor : मंजुषा नागपुरे या पुणे महापालिकेतील एक अनुभवी चेहरा म्हणून ओळखल्या जातात.
पुणे:

PMC Mayor News : पुणे महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागून 2 आठवडे उलटल्यानंतर अखेर शहराला नवा कारभारी मिळाला आहे. पुण्याच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपच्या कोअर कमिटीने सुचवलेल्या नावांपैकी नागपुरे यांच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मोहोर उमटवली. 

यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला आहे. या निवडीमध्ये अनुभवी चेहऱ्याला संधी देतानाच शहरातील भौगोलिक समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला आहे.

कोण आहेत मंजुषा नागपुरे?

मंजुषा नागपुरे या पुणे महापालिकेतील एक अनुभवी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. नगरसेवक म्हणून निवडून येण्याची ही त्यांची सलग चौथी टर्म आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या, ज्यामुळे त्यांची प्रभागातील ताकद स्पष्ट झाली होती. 

नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी महापौरपदाच्या शर्यतीत वर्षा तापकीर यांचे नाव आघाडीवर होते, मात्र प्रशासकीय अनुभव आणि राजकीय गणिते पाहता पक्षाने नागपुरे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Ajit Pawar Death :अजित दादांची चप्पल चोरून घरात केली होती पूजा; अमोल मिटकरींनी सांगितली काळजाला भिडणारी आठवण )

काय आहे अजित पवार कनेक्शन?

पुणे महापालिकेची ही निवडणूक अत्यंत वेगळ्या राजकीय परिस्थितीत पार पडली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या चर्चेनुसार ही निवडणूक मैत्रीपूर्ण लढवण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या करारानुसार, महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते. 

अजित पवारांनी दिलेला शब्द पाळत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपुरे यांचा बिनविरोध महापौर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा : Ajit Pawar Death : अजित पवारांच्या मृत्यूनंतर 5 बदल अटळ, फडणवीस ते शरद पवार सर्वांची कशी वाढणार डोकेदुखी ? )
 

भाजपचा संयमी निर्णय आणि निधनाचे सावट

पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची घोषणा झाल्यानंतर भाजपाने एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे शहरात सध्या शोकाकुल वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना विजयोत्सव साजरा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नवनियुक्त महापौरांच्या निवडीनंतर फटाके उडवू नका, गुलाल उडवू नका आणि कोणत्याही प्रकारचे बॅनर लावू नका, असे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून केवळ साध्या पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

Advertisement

महापालिकेतील पक्षीय बलाबल

पुणे महापालिकेच्या एकूण 165 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. भाजपला एकूण 119 जागा मिळाल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 27 जागांवर विजय मिळवता आला आहे. काँग्रेसने 15 जागा जिंकल्या असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या संख्याबळानुसार भाजपचे पारडे जड असले तरी मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याचे धोरण भाजपने ठेवले आहे.

उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर

महापौरपदासोबतच उपमहापौरपदाचे नावही भाजपने जाहीर केले आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या परशुराम वाडेकर यांची उपमहापौर म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली. नागपुरे आणि वाडेकर यांची ही जोडी आता पुण्याच्या विकासाचा गाडा हाकणार आहे. चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या तीन महिलांच्या नावांची शिफारस कोअर कमिटीने केली होती, ज्यामध्ये मानसी देशपांडे यांच्या नावाचाही समावेश होता, मात्र अनुभवाच्या जोरावर मंजुषा नागपुरे यांनी बाजी मारली आहे.