उत्तर मध्य मुंबईत तगडी लढत, गायकवाड की निकम? कौल कुणाला?

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपने उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले. तर काँग्रेसने तेवढचा तगडा उमेदवार देत भाजप समोर तगडं आव्हान उभे केले.

Advertisement
Read Time: 4 mins
मुंबई:

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यात तगडी लढत होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पुनम महाजन यांची उमेदवार कापत भाजपने या मतदार संघात उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले. तर काँग्रेसने तेवढचा तगडा उमेदवार देत भाजप समोर मतदार संघात तगडं आव्हान उभे केले. त्यामुळे इथल्या लढतीचा निकाल काय लागणार याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड मानला जात होता. सुनिल दत्त यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र 2014 च्या मोदी लाटेत सुनिल दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांना पराभव सहन करावा लागला होता. आता दहा वर्षानंतर हा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. 

मतदान कमी झाल्याचा फायदा कोणाला? 

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात 51.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हा मतदार संघ हा समीश्र लोकवस्ती असलेला मतदार संघ आहे. या मतदार संघात वांद्रे पूर्वी सारख्या मध्यमवर्गीय झोपडपट्टीधारक मतदारांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे फिल्मस्टार्स राहात असलेल्या वांद्रे पश्चिमेकडचा हायप्रोफाईल मतदारही आहे. इथं कमी झालेले मतदान हे दोन्ही उमेदवारींची डोकेदुखी वाढवणारे असेच आहे. इथे मराठी मतदारांबरोबरच दलीत आणि उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या आहे. मुस्लिम मतदारही या मतदार संघात निर्णायक भूमीका बजावत आले आहेत. शिवाय उत्तर भारतीय मतदार कोणाच्या पारड्यात मतं टाकणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे. म्हणूनच योगी आदित्यनाथ यांच्या सभाही या मतदार संघात झाल्या. चार लाखांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार या मतदार संघात आहेत. दलित आणि मराठी मतांचा टक्काही मोठा आहे. या मतांवर काँग्रेसचा डोळा आहे.  तर पावणे तीन लाख उत्तर भारतीय मतदार इथे आहेत. दोन लाखांच्या आसपास गुजराती, मारवाडी मतदार आहेत. यांच्यावर भाजपची भिस्त आहे.  

Advertisement

प्रचारातले गाजलेले मुद्दे कोणते? 

या मतदार संघात काँग्रेस विरूद्ध भाजप अशी थेट लढत आहे. या मतदार संघात प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा संविधान बदलणे हा होता. भाजप 400 जागा संविधान बदलण्यासाठी मागत आहे. संविधान टिकले पाहीजे यासाठी मतदान करा हा प्रमुख मुद्दा वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रचारात घेतला होता. तर या मतदार संघात मुस्लिम मतदारांची संख्या पाहात हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्नही मतदार संघात झालेला दिसतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर मुस्लिम बहुल कुर्ल्यातही जाहीर सभा घेतली होती. तर कसाबचा मुद्दाही निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या करकरे यांच्याबाबच्या वक्तव्याचा वापरही प्रचारादरम्यान केला गेला. त्यामुळे विकास आणि भविष्यातील योजनां पेक्षा भावनीक मुद्द्यांनाच जास्त महत्व दिले गेले. 

Advertisement

मतदार संघात कोणाची किती ताकद? 

या मतदार संघात  विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदार संघ आहेत. यातील भाजपच्या ताब्यात दोन तर शिवसेना शिंदेगटाकडे दोन आमदार आहेत. शिवसेना ठाकरेंकडे एक आमदार आहे तर काँग्रेसकडे एक आमदार आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे कागदावर तरी बळाचा विचार करता महायुतीचे पारडे जड आहे. पण आमदार हे शिंदे गटात गेले असले तरी शिवसैनिक मात्र ठाकरेंबरोबर आहेत ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. शिवाय चांदिवलीमध्ये शिंदेंचे आमदार असले तरी तिथे काँग्रेस नेते नसिम खान यांची मोठी ताकद आहे. ते अगदी थोड्या फरकाने इथे पराभूत झाले होते. लोकसभेला उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. ती न मिळाल्याने ते नाराज होते. मात्र त्यांची नाराजी नंतर दुर झाली. त्याचा फायदा वर्षा गायकवाड यांना होऊ शकतो. तर भाजपने पुनम महाजन यांची उमेदवारी कापली. त्यामुळे प्रमोद महाजन यांना मानणारा या मतदार संघातली मतदार नाराज झालाय. तो काय भूमीका घेतो हे महत्वाचे ठरणार आहे. भाजपचे दोन आमदार, आणि शिंदेचे दोन आमदार या मतदार संघात आहेत. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही याच मतदार संघात आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेलार यांच्या प्रमाणे उद्धव ठाकरेही याच मतदार संघात आहेत.   

Advertisement

मतदार संघाचा इतिहास काय? 

2009 च्या मतदार संघ पुनर्रचनेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ तयार झाला आहे. तसे पाहाता हा मतदार संघ नेहमीच काँग्रेसच्या बाजूने उभा राहीला आहे. अभिनेते सुनिल दत्त यांनी यामतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. ते केंद्रात मंत्रीही होते. शिवसेनेच्या मधुकर सरपोतदार यांनाही या मतदार संघाने संधी दिली होती. सुनिल दत्त यांच्या निधनानंतर प्रिया दत्त या दोन वेळा विजयी झाल्या होत्या. मात्र 2014 च्या मोदी लाटेत प्रिया दत्त यांनाही पराभव सहन करावा लागला. पुनम महाजन यांनी अनपेक्षित पणे या मतदार संघातून विजय नोंदवला. 2019 सालीही पुनम महाजन या विजयी झाल्या. मात्र यावेळचे मताधिक्य मात्र घटले होते.