Asia Cup 2025: आशिया कप 2025 बाबत आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) बैठक ढाका येथे होणार होती, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यात सहभागी होण्यास नकार दिला. तथापि, नंतर BCCI ने या बैठकीला ऑनलाइन हजेरी लावली. या बैठकीत आशिया कपवर चर्चा झाली. ज्यामध्ये स्पर्धा आयोजित करण्याबाबत एकमत झाले आहे. ही स्पर्धा 8 सप्टेंबरपासून सुरू होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही स्पर्धा दुबई आणि अबू धाबी येथे आयोजित करण्यास सहमती दर्शविली आहे. BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी पुढील काही दिवसांत स्पर्धेच्या अंतिम तारखा निश्चित करतील. BCCI ने ECB (अमिरात क्रिकेट बोर्ड) सोबत 3 ठिकाणांसाठी करार केला आहे, परंतु आशिया कपसाठी फक्त 2 स्टेडियम वापरल्या जातील. BCCI ला स्पर्धेसाठी सरकारच्या मंजुरीची देखील वाट पाहत आहे.
या स्पर्धेसाठी संभाव्य ठिकाणे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि झायेद क्रिकेट स्टेडियम (अबू धाबी) आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोघेही एकाच गटात असतील. म्हणजेच गट टप्प्यात दोघांमधील सामना निश्चित दिसत आहे. बीसीसीआयला आठ संघांच्या या स्पर्धेचे आयोजन करण्याचा अधिकार आहे, परंतु भारत-पाकिस्तान संबंधांमधील कटुतामुळे ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाईल.
( नक्की वाचा : IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत ॲम्ब्युलन्सने मैदानाबाहेर, वाचा नेमकं काय घडलं? Video )
आशिया कपच्या आगामी आवृत्तीत आठ संघ सहभागी होतील. त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. स्पर्धेतील आठ संघांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागले जाईल. त्यानंतर प्रत्येक गटातील टॉप-२ संघ सुपर-४ टप्प्यासाठी पात्र ठरतील. भारत, पाकिस्तान, यूएई आणि हाँगकाँग यांना ग्रुप-ए मध्ये स्थान मिळू शकते. तर अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि ओमान यांना ग्रुप-बी मध्ये स्थान मिळू शकते.