Team india squad for England tour: 20 जूनपासून सुरु होणाऱ्या टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाच कसोटी मालिकांच्या या दौऱ्याचे नेतृत्व शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शुभमन गिलकडे संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
टीम इंडियाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही मालिका 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन सारख्या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघासाठी ही एक नवीन सुरुवात आहे. यासोबतच भारतीय कसोटी संघालाही नवा कर्णधार मिळाला आहे.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी एका तरुण भारतीय संघाची निवड केली आहे. यशस्वी जयस्वाल आणि अभिमन्यू ईश्वरन हे फलंदाजीची सुरुवात करण्याची जबाबदारी घेऊ शकतात. साई सुदर्शन आणि करुण नायर यांना मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे, जे कोहलीच्या अनुपस्थितीत क्रमांक ४ ची भूमिका बजावू शकतात. ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे आणि तो यष्टीरक्षकासोबतच मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावेल. ध्रुव जुरेलची दुसऱ्या यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शाद्रुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.