Chris Woakes Played with Broken Hand IND vs ENG 5th Test:'केनिंग्टन ओव्हल' येथे झालेला हा रोमांचक सामना भारताने 6 धावांनी जिंकला. 5 सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंड पराभवाच्या जवळ असताना, तुटलेल्या हाताने आणि एका हाताने बॅट पकडून मैदानात उतरलेला खेळाडू दुसरा कोणी नसून ख्रिस वोक्स होता. अखेरचा फलंदाज म्हणून मैदानात उतरून त्याने चाहत्यांची मनं जिंकली. जखमी असताना केवळ आपल्या संघासाठी शेवटच्या क्षणी तो मैदानात आला. इंग्लंड जरी सामना हरला असला तरी वोक्सच्या एका कृतीने त्याने क्रिकेट चाहत्यांची मनं मात्र जिंकली.
क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक क्षण आहेत, जे चाहत्यांच्या कायम लक्षात राहतात. ओव्हलमधील सामन्यात जखमी असूनही वोक्स एका हाताने बॅट पकडून खेळण्यासाठी उतरला. हे दृश्य क्रिकेट इतिहासाच्या पानांवर कायमचे कोरले गेले. खेळ आणि खेळाडूची जिद्द पाहायची असेल तर हे एक उत्तम उदाहरण आहे. याआधी चौथ्या कसोटीत पायाला दुखापत असतानाही ऋषभ पंत मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याने आपले अर्धशतक ही झळकावले होते. त्याच्या जिद्दीलाही सर्वांनी सलाम केला होता.
या पाच सामन्यांच्या मालिकेत अशा अनेक घटना घडल्या, ज्यातून खेळावरील प्रेम आणि खिलाडूवृत्ती दिसून आली. पाचव्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी ख्रिस वोक्स जखमी हाताने मैदानात उतरल्याने, महान वेगवान गोलंदाज मॅल्कम मार्शल यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात मार्शल सुद्धा तुटलेल्या हाताने फलंदाजीला आले होते. वोक्सची तुलना त्यांच्याशी केली जात होती. हाताला, पायाला, जबड्याला किंवा इतर कोणत्याही भागाला फ्रॅक्चर असताना फलंदाजी किंवा गोलंदाजी करणे, ही क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना आहे.