भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या उत्कृष्ट फलंदाजीची जगाला ओळख आहे. तो मैदानात असेपर्यंत विरोधी संघाच्या गोलंदाजांची काही धडगत नसायची. फलंदाजी करताना तो ज्या प्रकारे फटके मारायचा, त्यामुळे काही षटकांतच सामना विरोधी संघाच्या हातातून आपल्या बाजूने खेचून आणायचा. फलंदाजी करताना सेहवागची एक खासियत होती, तो मैदानात नेहमी गुणगुणत राहायचा. यामागे अनेक कारणं आहेत. पण खरी गोष्ट काय आहे, याचा खुलासा त्याचा सलामीचा जोडीदार राहिलेल्या सचिन तेंडुलकरने केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका खास चर्चेदरम्यान सचिनने सेहवागबद्दल बोलताना सांगितले होते, "मी वीरूला म्हणजेच वीरेंद्र सेहवागला सांगत होतो की हा गोलंदाज कदाचित इथे चेंडू टाकेल. तू दोन षटके त्याला बघून खेळ. पुढची 48 षटके तो तुला बघत राहील. वीरू त्याचे डोके हलवत होता. सोबत गाणे गुणगुणत होता. तीन, चार, पाच षटके अशीच निघून गेली. मी म्हणालो, 'हे काय चालले आहे? आता तू हे थांबव नाही तर मी तुला एक फटका देईन.'
आपले बोलणे पुढे चालू ठेवत सचिन म्हणाला, "मग त्याने मला घाईघाईने सांगितले की नाही पाजी, जर मी गाणे बंद केले ना, तर त्या वेळी मनात खूप विचार येतात. माझे मन एका जागी स्थिर राहत नाही. इकडे-तिकडे भरकटते. त्याला व्यस्त ठेवण्यासाठी मी गाणे गात आहे. मग मी त्याला म्हणालो की कमीतकमी मला तरी सांग की तुझ्या मनात काय चालले आहे, मग आपण त्यानुसार खेळू." असा किस्सा सचिनने सांगितला. त्यामुळे मन एकाग्र ठेवण्यासाठी विरू मैदानातच गाणी गात होता असं ही त्याने स्पष्ट केले आहे.