पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने आशिया कप 2025 च्या सुपर-4 सामन्यात भारताविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले आणि त्याचे वेगळ्याच पद्धतीने सेलिब्रेशन केले. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर षटकार मारून 34 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्यानंतर त्याने ‘बंदूक चालवल्यासारखे' (Gun Firing Celebration) हावभाव करून आनंद व्यक्त केला. फरहानच्या या खेळीमुळे पाकिस्तानने 10 षटकांत 91 धावांपर्यंत मजल मारली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार मारले. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या फरहानने सलामीचा साथीदार फखर जमान बाद झाल्यावर वेग पकडला. त्याला दोन वेळा जीवदानही मिळाले, कारण अभिषेक शर्माला त्याचे झेल पकडता आले नाहीत.
'गन सेलिब्रेशन' वरून वाद
फरहानच्या या सेलिब्रेशनवर आता नवा वाद निर्माण झाला आहे. अर्धशतक झाल्यावर खेळाडू आनंद व्यक्त करतोच, पण भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. साहिबजादा फरहान आपल्या 'गन सेलिब्रेशन'ने नेमका कोणावर निशाणा साधत होता, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खेळभावनेवर प्रश्नचिन्ह
फरहानचे हे सेलिब्रेशन त्याच्या खेळाच्या वृत्तीवर आणि खेळभावनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या कृतीतून त्याच्या मनात देशासाठी किती सन्मान आहे, हे दिसून येते, अशी टीका केली जात आहे. मैदानाबाहेरही दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. एप्रिल 2025 मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता, आणि त्यानंतर सीमेवर झालेल्या गोळीबारामुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडले आहेत. अशा परिस्थितीत साहिबजादा फरहानच्या या कृतीमुळे वाद आणखी वाढू शकतो. या घटनेनंतर भारतीय क्रिकेट संघ किंवा बीसीसीआयने कोणती तक्रार दाखल केली आहे का, किंवा मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यावर काही कारवाई करतात का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.