Cheteshwar Pujara Retiremet: क्रिकेट विश्वातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. पुजाराने घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयाने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.
भारतीय जर्सी घालणे, भारतीय राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावर उतरताना प्रत्येक वेळी सर्वोत्तम देण्याची आवड, या सर्व गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत. या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पण, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट होतो. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भावुक पोस्ट शेअर करत पुजाराने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
चेतेश्वर पुजाराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने देशासाठी एकूण १०८ सामने खेळले. या दरम्यान त्याच्या बॅटने १८१ डावांमध्ये ७२४६ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १९ शतके आणि ३५ अर्धशतके आहेत. त्याने देशासाठी एकूण १०३ कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला. दरम्यान, त्याने १७६ कसोटी डावांमध्ये ४३.६० च्या सरासरीने ७१९५ धावा केल्या. त्याच वेळी, त्याच्या बॅटने पाच एकदिवसीय डावांमध्ये १०.२० च्या सरासरीने ५१ धावा केल्या.