चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएल2025 मधील आव्हान कधीच संपलं आहे. असं असलं तरी स्पर्धेच्या शेवटी चेन्नईला विजयाची चव चाखता आली आहे. चेन्नई विरुद्ध गुजरात यामध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने गुजरातवर 83 धावांनी विजय मिळवला आहे. गुजरातला पूर्ण 20 ओव्हर्स ही खेळता आल्या नाहीत. त्यांचा डाव 19 षटकात गडगडला. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला असला तरी एका खेळाडूने आपल्या छोटेखानी खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. दरम्यान गुजरातच्या या पराभवामुळे प्ले ऑफ मधली चार संघाच्या स्थितीत ही बदल होण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चेन्नईने गुजरात विरुद्धच्या सामन्याच टॉस जिंकला. त्यानंतर प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चेन्नईचा हा निर्णय त्यांच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. आयुश म्हात्रे आणि डेव्हन कॉन्वे यांनी चार ओव्हर्समध्ये 44 धावांची दमदार सलामी दिली. म्हात्रे 34 धावा काढून बाद झाला. तर डेव्हन कॉन्वे याने आपले अर्धशतक पुर्ण केले. शिवम दुबेला या सामन्यात चमक दाखवता आली नाही. पण देवाल्ड ब्रेव्हिसने मात्र 23 चेंडूत 57 धावा ठोकल्या.
पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते उर्विल पटेल याने. त्याने आपल्या छोट्याश्या खेळीत सर्वांनाच आवाक केले. उर्विलने वन डाऊन खेळताना 19 चेंडूत 37 धावांची जलद खेळी केली. त्यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्याला साई किशोरने आऊट केले. त्याच्या या खेळीत त्यांने लगावलेले फटके हे अप्रतिम होते. शिवाय त्याचा आत्मविश्वासही मोठा दिसून आला. त्यामुळे आगामी काळातील चेन्नईचा स्टार म्हणून उर्विल पटेलकडे पाहिले जात आहे. दरम्यान चेन्नईने गुजरातला 231 धावांचे लक्ष दिले होते.
231 धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल 13 धावा काढून बाद झाला. साई सुदर्शन वगळता एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. साई सुदर्शनने सर्वाधिक 41 धावा केल्या. त्याला दुसऱ्या बाजूकडून योग्य साथ मिळाली नाही. ठरावीक अंतराने गुजरातच्या विकेट पडत होत्या. 18.3 ओव्हर्समध्ये गुजरातचा डाव 147 धावांत गडगडला. चेन्नईकडून अंशूल कंबोज आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.