IPL 2025 SRH Vs DC: आयपीएल 2025 चा 10 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैद्राबादच्या संघाचा सात विकेट्सने दारुण पराभव केला. हैद्राबादने दिलेल्या 163 धावांचे आव्हान दिल्लीच्या संघाने 16 व्या षटकामध्येच सात गड्यांच्या मोबदल्यात केले.
दिल्ली कॅपिटल्सने 164 धावांचे लक्ष्य फक्त 16 षटकांत पूर्ण केले. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने पहिल्या गोलंदाजीत 5 बळी घेत चमत्कार केला. त्यानंतर फलंदाजी करताना फाफ डु प्लेसिसने फक्त 27 चेंडूत 50 धावा केल्या. दिल्लीचा हा सलग दुसरा विजय आहे. हैदराबादचा हा दुसरा पराभव आहे. 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून जॅक फ्रेझर मॅकगर्कने 38 आणि अभिषेक पोरेलने नाबाद 34 धावा केल्या.
तत्पुर्वी, सामन्यात नाणेफेक जिंकून पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी घेतली मात्र त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. कारण सनरायझर्स हैदराबादचे स्फोटक फलंदाज मिशेल स्टार्कच्या कहरासमोर टिकू शकले नाहीत. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशानला बाद केल्यानंतर, स्टार्कने त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नितीश कुमार रेड्डी (०) ला अक्षर पटेलकडून झेलबाद केले. चौथी विकेट 37 धावांवर ट्रॅव्हिस हेडच्या रूपात पडली, त्यालाही स्टार्कने बाद केले.