IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे. मुंबईच्या संघाने या आयपीएल हंगामात आत्तापर्यंत चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईच्या टीमला जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची उणीव भासणे साहजिक आहे. अशातच आता बुमराहच्या पुनरागमनाबाबत एक सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच संघात पुन्हा एन्ट्री करणार आहे. बुमराह पुढील एक-दोन दिवसांत मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील होऊ शकतो. मुंबई इंडियन्सच्या टीमने जबरदस्त व्हिडिओ शेअर करत क्रिकेट फॅन्सना ही आनंदाची बातमी दिली आहे.
माध्यमांमधील माहितीनुसार, मुंबईचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात सामील झाला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तथापि, खेळाडू 7 मार्च (सोमवार) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. पण तो 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराहला पाठीत दुखू लागले आणि त्याला स्कॅनसाठी सिडनी स्टेडियममधून रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही. सामन्याच्या शेवटच्या डावात तो क्षेत्ररक्षण करण्यासाठीही मैदानावर आला नाही. त्या मालिकेत त्याने 150 हून अधिक षटके टाकली. त्याने 9 डावांमध्ये 13.06 च्या सरासरीने सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या सामन्यापासून जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानावर खेळू शकलेला नाही. त्याला त्याच्या पाठीच्या खालच्या भागात त्रास जाणवत होता. बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या संघाने आतापर्यंत सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर आणि अश्विनी कुमार यांना पदार्पण केले आहे. तिघांनीही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रभावित केले आहे परंतु मुंबई संघाला आतापर्यंत हंगामातील चार सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवता आला आहे.