मुंबईने हैदराबादचा पराभव केला. हैदराबादने दिलेले 163 धावांचे लक्ष्य मुंबईने सहज पार केले. मुंबईनं 19 व्या षटकात हे लक्ष पूर्ण करत चार विकेटने विजय मिळवला. या विजयामुळे स्पर्धेतली चुरस आणखी वाढली आहे. मुंबईच्या डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि रायन रिकलटन यांनी केली. रोहित शर्मा याने सुरूवात धडाकेबाज केली. पण त्याला मोठी खेळी पुन्हा एकदा उभारता आली नाही. रोहित शर्मा 16 चेंडूत 26 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन षटकार ठोकले. तर रायनही 31 धावांची खेळी करून बाद झाला. मुंबईची सलामीची जोडी आठव्या षटकात 69 धावा करून तंबूत परतली होती. विल जॅक्सही जास्त वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाही. तर सुर्यकुमार यादवने ही जोरदार सुरूवात करत दोन षटकार आणि दोन चौकार लगावत 26 धावा केल्या. त्याला पॅट कमिन्सने आऊट केले. त्यानंतर मात्र तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी मुंबईचा विजय सुकर केला. पण विजयासाठी एक धाव हवी असताना हार्दिक पांड्या 21 धावांवर आऊट झाला. त्याने 9 बॉलमध्ये या धावा केल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई विरुद्ध हैदराबात सामन्यात मुंबईचा कॅप्टन हार्दीक पांड्या याने टॉस जिंकला. त्यानंतर त्याने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हीस हेड यांनी डावाची सुरूवात केली. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 162 धावा केल्या. त्यांच्या पाच फलंदाज बाद झाले. मुंबई समोर हैदराबादने 163 धावांचे लक्ष दिले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 40 धावा केल्या. 28 चेंडूंचा सामना करताना त्याने सात चौकार लगावले. मात्र त्याला एकही षटकार ठोकता आला नाही. क्लासने आणि हेड यांनी चांगली सुरूवात केली. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही.
अभिषेक शर्मा याने आपल्या 40 धावांच्या खेळीत सात चौकार लगावले. त्याला हार्दीक पांड्याने बाद केले. तर ट्रेव्हीस हेड याने 29 चेंडूत 28 धावा केल्या. त्यात त्याने तीन चौकार लगावले. नेहमीच्या आक्रमक शैलीत त्याला या सामन्यात खेळता आले नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी त्याला फटकेबाजीपासून रोखले होते. इशांत किशन पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. नितीश रेड्डीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो 21 चेंडूत 19 धावा करून बाद झाला.
क्लासेनने मात्र शेवटच्या षटकात जोरदार फटकेबाजी केली. त्याने 28 चेंडूत 37 धावा ठोकल्या त्यात 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर अनिकत वर्माने त्याला चांगली साथ देत आठ चेंडूत आठरा धावा केल्या. त्यात दोन षटकार त्याने ठोकले. मुंबईकडून विल जॅक्स याने दोन जणांना आऊट केले. तर ट्रेंड बोल्ड, बुमरा, हार्दीक पांड्या यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या. बुमराने सुरूवाती पासूनच हैदराबादच्या फलंदाजांना बांधून ठेवले होते. त्यामुळे हैदराबादला 162 धावाच करता आल्या.