Atharva ankolekar News: इंडियन प्रिमिर लीग म्हणजेच आयपीएल 2026 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी पार पडला. या लिलावात मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात कमी किंमतीसह या लिलावात उतरला आहे. सर्वांत कमी किंमत असूनही मुंबईने आपल्या ताफ्यात धडाकेबाज खेळाडू घेतले. यापैकी लोकल बॉय अथर्व अंकोलेकरचाही समावेश आहे. कोण आहे अथर्व अंकोलेकर ज्याने अंडर 19 विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. जाणून घ्या...
कोण आहे अथर्व अंकोलेकर?
अथर्व अंकोलेकर अधेरीचा असून त्याचा जन्म 26 सप्टेंबर 2000 मध्ये झाला. तो भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळतो. 2019 च्या ACC अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत तो सर्वाधिक बळी घेणारा आणि अंतिम सामन्यातील सामनावीर ठरला होता. मुंबईने अथर्वला 30 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी केले. जानेवारी 2021 मध्ये अथर्वने मुंबईच्या सीनियर टीमकडून पदार्पण केले. अथर्व हा ऑलराऊंडर असून डावखुरी बॅटिंग आणि स्पिन बॉलिंग करतो.
अथर्वचा क्रिकेटच्या मैदानावर पोहोचण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. अथर्वच्या वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. ते मुंबईच्या ट्रान्सपोर्ट पब्लिक सर्व्हिसमध्ये काम करत होते. आपल्या मुलाला क्रिकेट खेळवण्यासाठी अथर्वच्या वडिलांनी ८ वर्षे रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केले. त्यांच्या मृत्यूनंतर अथर्वच्या आईने त्याच्या स्वप्नांना बळ दिले.
वडिलांचे निधन.. आईने केला संघर्ष
अथर्वची आई वैदेही या बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून काम करू लागल्या. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी अथर्वच्या क्रिकेटच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज केले. अथर्वनेही मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत क्रिकेटचे मैदान गाजवले. आता अथर्वच्या आईच्या कष्टाला आणि त्याच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. मुंबईच्या ताफ्यात एन्ट्री झाल्याने अथर्व आता मोठ्या सामन्यात आपला खेळ दाखवणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या अशा दिग्गजांसोबत तो मैदानावर खेळताना दिसेल.
( नक्की वाचा : IPL Auction 2026 LIVE: आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी )