Ind vs NZ Final T20 World Cup 2026: : टी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम थरार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला नमवत विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवला. फायनलच्या या थरारक सामन्यात टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी जिगरबाज खेळी केली. दुर्दैवी म्हणजे या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या इशान किशनवर मॅचआधीच दुःखाचा डोंगर कोसळला, त्याची बहीण आणि दाजीचे अपघाती निधन झालं. हे आभाळाएवढं दुःख लपवून इशान देशाला विश्वविजेता बनवण्यासाठी मैदानात उतरला. (Ishan Kishan lost his cousin sister and brother in law)
इशान किशनची बहीण आणि दाजीचा अपघाती मृत्यू
भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचा खेळाडू इशान किशनची चुलत बहीण आणि तिच्या पतीचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वैष्णवी सिंह आणि ऋत्विक ठाकूर अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे इशांतचे वडीलही सामन्याला उपस्थित राहू शकले नाहीत. इशान किशनची बहीण आणि दाजी एका लग्नासाठी जात असताना ही दुर्घटना घडली.
सुदैवाने या अपघातातून त्यांची दोन लहान मुले बचावली. ही बातमी समजताच इशान किशनला मोठा धक्का बसला. मात्र आपले दुःख विसरुन तो मैदानात उतरला अन् अंतिम सामन्यात झळकला. सामन्यानंतर स्वतः इशानने या अपघाताची माहिती दिली. तसेच हा विजय लाडक्या बहिणीला समर्पित करत असल्याचेही तो म्हणाला.
विजय बहिणीला समर्पित
"फायनलच्या अगदी आधी एका कार अपघातात मी माझ्या चुलत बहिणीला गमावले. मी तिच्यासाठी खेळलो, मी हार्दिक भाईशी याबाबत बोललो आणि त्याने मला संघाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. मी हा विजय तिला समर्पित करतो आणि आज महिला दिन आहे, त्यामुळे तो अधिक खास बनतो, अशी भावुक प्रतिक्रिया इशान किशनने सामन्यानंतर दिली.
दरम्यान, त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सामना खेळताना, इशानने फक्त २५ चेंडूत ५४ धावा केल्या आणि त्याच्या संघाला २५५ धावांचा मोठा टप्पा गाठण्यास मदत केली. केवळ फलंदाजीतच नाही तर इशानने क्षेत्ररक्षणातही आपली हुशारी दाखवली त्याने तीन शानदार झेल घेतले, ज्यामुळे संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.