IPL 2026 MI vs KKR : इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे आयपीएल 2026 ची धमाकेदार सुरुवात काल बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर झाली. आरसीबीने सनरायझर्स विरोधात झालेल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर आज वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रगंला. मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाने मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. 20 षटकांमध्ये कोलकाताने 4 बाद 220 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर 221 धावांचं तगडं आव्हान होतं. परंतु, मुंबई इंडियन्सचे सलामीचे धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मैदानात धावांचा पाऊस पाडला आणि केकेआरविरोधात दणदणीत विजय मिळवला. मुंबईने 19.1 षटकात 224 धावा करून केकेआरचा पराभव केला.
रोहित शर्मा-रियान रिकल्टनची तुफानी अर्धशतकी खेळी
मुंबई संघासाठी रोहित शर्माने वादळी खेळी करून 38 चेंडूत 78 धावा कुटल्या. रोहितने या इनिंगमध्ये 6 चौकार आणि 6 षटकार ठोकले. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव 16 धावांवर तंबूत परतला. कार्तिक त्यागीने सूर्यकुमारला झेलबाद केलं. त्यानंतर रिकल्टनने चौकार-षटकारांचा धडाका कायम ठेवला. रिकल्टनने 43 चेंडूत 81 धावांची जबरदस्त अर्धशतकी खेळी साकारली. हार्दिक पंड्याने नाबाद धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने 20 धावांची खेळी केली.
कोलकाता संघासाठी कर्णधार अजिंक्य रहाणेनं 40 चेंडुत 67 धावा केल्या. या इनिंगमध्ये 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. फिन एलनने 17 चेंडूत 37,तर कॅमरून ग्रीनने 10 चेंडूत 18,विकेटकीपर अंगकृष रघुवंशीने 29 चेंडूत 51 धावांची दमदार खेळी केली. तर रिंकू सिंगने21 चेंडूत 33 धावांची नाबाद खेळी केली. मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पंड्याने 2, गझनफार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर कोलकातासाठी वैभव अरोरा आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी एक विकेट घेतली.