Padma Award 2026 List : भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकपचा पहिला किताब जिंकवून देणारी हरमनप्रीत कौर, 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला टी-20 मध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. आज रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. टेनिसचे माजी दिग्गज विजय अमृत राज यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यावर्षी पद्मश्री मिळालेल्या दिग्गजांमध्ये पॅरिस पॅरालिंपिक 2024 चा सुवर्ण पदक विजेता पॅरा अॅथलिट प्रवीण कुमार, भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पूनिया, देशात महिला हॉकी संघाला यश मिळवून देणारे कोच बलदेव सिंग, भगवानदास रायकवार आणि के पजानिवेल यांच्या नावाचा समावेश आहे.
विजय अमृतराज यांना पद्मभूषण
विजय अमृतराज: विजय अमृतराज हे असे खेळाडू आहेत ज्यांनी टेनिससारख्या जागतिक खेळात भारताला ओळख मिळवून दिली. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे जन्मलेल्या अमृतराज यांनी विंबलडन आणि यूएस ओपन या दोन्ही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या क्वार्टर फायनलपर्यंत दोनदा मजल मारली होती.
हरमनप्रीत कौर
भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी पहिल्यांदाच आयसीसी वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वात महिला संघाने पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. हरमनप्रीतच्या दमदार नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि अनेक वर्षांचा किताबाचा दुष्काळ संपवला.
रोहित शर्मा
भारतीय पुरुष संघाने रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.माजी कर्णधार रोहित यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.तसेच, गेल्या वर्षी भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही मिळवले.
व्लादिमीर मेस्तविरिशविली
दिग्गज जॉर्जियाई कुस्ती प्रशिक्षक व्लादिमीर मेस्तविरिशविली यांना मरणोत्तर पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी भारतातील कुस्तीला यशाच्या शिखरावर नेण्यात मोठं योगदान दिलं आहे.1982 ते 1992 या कालावधीत ते जॉर्जियाच्या राष्ट्रीय कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.2003 मध्ये ते भारतात आले आणि येथे येऊन त्यांनी अनेक भारतीय कुस्तीपटूंच्या कारकिर्दीला घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नक्की वाचा >> पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये नेमका फरक काय? पैसे मिळतात का? सर्व माहिती वाचा
बलदेव सिंह
भारतीय महिला हॉकीमध्ये परिवर्तन घडवण्याचे मोठे श्रेय बलदेव सिंह यांना जाते. त्यांनी अनेक नामांकित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला हॉकीपटूंना घडवले आहे.भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार राणी रामपाल यांचे ते प्रशिक्षक होते.महिला हॉकीच्या क्षेत्रात त्यांचे योगदान इतके मोठे आहे की त्यांना “महिला हॉकीची नर्सरी” म्हणून ओळखले जाते.
भगवानदास रायकवार
भगवानदास रायकवार यांना मार्शल आर्ट्स क्षेत्रातील त्यांच्या असाधारण योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मध्य प्रदेशातील सागर येथे राहणारे ८३ वर्षीय रायकवार यांनी पारंपरिक मार्शल आर्ट्सच्या जतन आणि संवर्धनासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले आहे.ते बुंदेलखंड प्रदेशातील पारंपरिक मार्शल आर्ट प्रसिद्ध “बुंदेली युद्धकला” (अखाडा संस्कृती) यांचे संरक्षण,विकास आणि प्रसार करण्याचे कार्य दशकानुदशके करत आहेत.या प्राचीन युद्धकलेच्या परंपरेला जिवंत ठेवण्यात त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय मानले जाते.
प्रवीण कुमार
उत्तर प्रदेशचे पॅरा-अॅथलीट प्रवीण कुमार यांना देखील पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला आहे. ते हाय जंप (उंच उडी) स्पर्धेतील खेळाडू आहेत.
प्रवीण कुमार यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचत टी-64 पुरुष हाय जंपच्या अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकले होते.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव जागतिक पातळीवर चमकवले.
नक्की वाचा >> अकोल्यात कोण होणार महापौर? इच्छुकांची मांदियाळी, भाजपच्या 'या' 5 उमेदवारांची नावं आघाडीवर
के. पजानिवेल
पद्दुचेरीचे के. पजानिवेल यांना प्राचीन तमिळ शस्त्राधारित मार्शल आर्ट ‘सिलंबम' (Silambam) याच्या प्रसार आणि संवर्धनासाठी पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला आहे. पद्दुचेरीचे प्रख्यात सिलंबट्टम (Silambattam) तज्ज्ञ असलेले के. पजानिवेल गेल्या 40 वर्षांपासून या पारंपरिक युद्धकलेचा अभ्यास आणि प्रशिक्षण देत आहेत.
सविता पुनिया
भारतीय महिला हॉकी संघाच्या गोलरक्षक सविता पुनिया यांचा यंदा पद्मश्री सन्मान मिळवणाऱ्या पाच व्यक्तींमध्ये समावेश आहे.
सविता पुनिया 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये त्या भारतीय संघाचा भाग होत्या. त्यांनी 36 वर्षांनंतर पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता.
2017 मध्ये FIH महिला वर्ल्ड लीग राऊंड–2 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी ‘गोलकीपर ऑफ द टूर्नामेंट' हा किताब जिंकला.
त्याच वर्षी झालेल्या महिला आशिया कप 2017 मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे भारताला १३ वर्षांनी ट्रॉफी जिंकण्यात यश मिळाले.
सविता पुनियाने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये उप-कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी निर्णायक कामगिरी बजावली आणि संघाला चौथ्या स्थानापर्यंत पोहोचवण्यात मोठं योगदान दिलं.