- पावसामुळे विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 27 धावांनी पराभूत केले आहे
- राजस्थानने 150 धावांचा डोंगर उभा केला, यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी स्फोटक भागीदारी केली
- मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि रायन रिकलटन लवकर बाद झाले
पावसामुळे विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) आपला विजयी वारू कायम राखला आहे. मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव करत राजस्थानने यंदाच्या हंगामात विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. या शिवाय गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पावसामुळे प्रत्येकी 11 षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 150 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी अवघ्या 5 षटकांत 80 धावांची स्फोटक भागीदारी केली. वैभवने 14 चेंडूंत 39 धावा कुटल्या. तर यशस्वीने 32 चेंडूंत नाबाद 77 धावांची खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कर्णधार रियान परागने 20 धावांचे योगदान दिले.
151 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. रायन रिकलटन (8), रोहित शर्मा (5) आणि सूर्यकुमार यादव (6) हे स्वस्तात परतल्याने मुंबईची स्थिती 5 बाद 46 अशी झाली होती. शेरफन रदरफोर्ड आणि नमन धीर यांनी प्रत्येकी 25 धावा करत डावाला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपुरा ठरला. राजस्थानच्या नांद्रे बर्गर, संदीप शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 बळी घेत मुंबईला 123 धावांवर रोखले. मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. कॅप्टन हार्दीक पंड्याला ही चमकदार कामगिरी करता आली नाही.
नक्की वाचा - VIDEO: आवेश खानची मोठी चूक; लखनऊचा विजय पराभवात बदलला असता; नियम काय सांगतो?
आयपीएलच्या 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला धूळ चारली आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत राजस्थानने 27 धावांनी बाजी मारली. या विजयासह राजस्थानने पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 चे स्थान काबीज केले आहे. रात्री 10:10 वाजता सुरू झालेल्या या सामन्यात षटकांची कपात करण्यात आली होती. राजस्थानच्या यशस्वी जयस्वालने 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 77 धावा केल्या. त्याला वैभव सूर्यवंशीने 39 धावा करत चांगली साथ दिली. मुंबईच्या गजनफरने 2 विकेट्स घेतल्या, पण तो राजस्थानची धावगती रोखू शकला नाही.
मुंबईच्या फलंदाजांनी सातत्याने विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव लवकर बाद झाल्याने मुंबईचा संघ दबावाखाली आला. रदरफोर्ड आणि नमन धीर यांनी झुंज दिली, पण नांद्रे बर्गर आणि संदीप शर्माच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे फलंदाज टिकू शकले नाहीत. मुंबईचा हा या हंगामातील दुसरा पराभव ठरला आहे. हा सामना विलंबाने सुरू झाल्यामुळे 9-9 षटके कमी करण्यात आली. या विजयामुळे राजस्थान रॉयल्स 6 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत, तर मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर कायम आहे.