Shahid Afridi Big Statement: क्रिकेट विश्वात सध्या आशिया चषकाची जोरदार चर्चा सुरू आहे. या स्पर्धेतील महत्त्वपूर्ण सामन्यात आज, 14 सप्टेंबर 2025 रोजी होत आहे. हा सामना भारत आणि पाकिस्तान या पारंपारीक प्रतिस्पर्ध्यां बरोबर होत आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने संघाच्या फलंदाजीवर चिंता व्यक्त केली आहे. सध्याच्या संघातील फलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. पण त्याला एका फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तसं त्याने बोलून ही दाखवलं आहे. त्यामुळे या फलंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
चिंतेचे कारण अन् आफ्रिदीची अपेक्षा
एका मुलाखतीत आफ्रिदीने सांगितले की, ‘आमची गोलंदाजी आणि फिरकीपटू चांगले आहेत. पण फलंदाजीची चिंता आहे. गेल्या काही मालिकांमध्ये कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत नाही. बाबर आझम संघासोबत असताना तो जास्त चेंडू खेळत असे. तो धावा करेल असा विश्वास होता. पण सध्याच्या संघात असा एकही फलंदाज नाही. तुम्ही सॅम अयुब, साहिबजादा फरहान आणि कर्णधार सलमान अली आगाकडे पाहिले, तर त्यांनाही सातत्य राखता आलेले नाही.' याच मुलाखतीत त्याने युवा फलंदाज हसन नवाजचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘मला या मुलाकडून खूप अपेक्षा आहेत.'
कोण आहे हसन नवाज?
हसन नवाज हा 21 ऑगस्ट 2002 रोजी इस्लामाबादमध्ये जन्मलेला एक तरुण पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. आत्तापर्यंत त्याने 3 एकदिवसीय (वनडे) आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 3 डावांमध्ये 112.00 च्या सरासरीने 112 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये 20 डावांमध्ये 24.50 च्या सरासरीने 441 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 1 अर्धशतक, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतके आहेत.
भारत पाकीस्तान सामना रंगणार
आशिय चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत पाकिस्तान मॅच म्हटलं की ही हाय होल्टेज मॅच असते. दोन्ही संघानी आपला पहिला सामना जिंकत विजयी सुरूवात केली आहे. भारताने युएईची धुव्वा उडवला होता. तर पाकिस्ताने ओमानला पराभूत केले. दोन्ही सामने एकतर्फी झाले. पण आजचा सामना क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानी असेल. हा सामना अटीतटीचा होईल अशी क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे.