Ind w vs Aus w : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये महिला विश्वचषकाचा सेमिफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कांगारूंनी धावांचा पाऊस पाडून भारतापुढे 339 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या फिबी लिचफिल्डने 93 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 119 धावांची शतकी खेळी केली होती. परंतु, टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी धडाकेबाज फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. जेमिमाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषकाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली.
फिबी लिचफिल्डने शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाला 338 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. तिने दुसऱ्या विकेटसाठी एलिसा पेरीसोबत 155 धावांची भागिदारी रचली. एलिसा पेरीने 77 धावांची खेळी केली. पण शेवटच्या सत्रात एशले गार्डनरने ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळली. तिने 67 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर या धावांचं आव्हान गाठण्यासाठी भारताच्या फलंदाजांनी दमदार खेळी केली. सलामीची फलंदाज शेफाली वर्मा अवघ्या 10 धावांवर बाद झाली. तर स्मृती मंधाना 24 धावा करून तंबूत परतली.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 88 चेंडूत 89 धावा कुटल्या. पण ती बाद झाल्यावर भारताच्या जेमिमाने आक्रमक फलंदाजी करून 127 धावांची नाबाद खेळी केली. दिप्ती शर्माने 24 तर रिचा घोषणे 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर अखेरच्या टप्प्यात अमनज्योत कौरने सावध खेळी करून नाबाद 15 धावा केल्या. भारतासाठी गोलंदाज क्रांती गौडने 1 विकेट घेतली. तर श्री चराणी आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अमनज्योत कौर आणि राधा यादवला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.