पुण्याच्या नुतन मराठी विद्यालयातला एक व्हीडिओ जोरादार व्हायरल होत आहे. त्यात एक शिक्षिका विद्यार्थ्याला अमानुष पणे मारत असल्याचे दिसत आहे. याची माहिती विद्यार्थ्याच्या पालकांना समजताच त्यांनी याची तक्रार पोलीसात केली आहे. शिवाय शिक्षेकेला बडतर्फ करण्याची मागणीही केली आहे. याची शाळेनेही दखल घेत शिक्षिके विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यात नुतन मराठी विद्यालय आहे. विद्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेत विद्यार्थी आपसात गोंधळ करत होते. त्यातून विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये मारहाण करत होते. हीबाब शिक्षिकेने पाहीली. त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी संबधित विद्यार्थ्याला वर्गात पुढे बोलवले. त्यानंतर त्याला चोप द्यायला सुरूवात केली. त्यांचे मारण्यासाठी हात थांबत नव्हेत. पाठीवर, डोक्यावर एकामागून एक फटके पडत होते. बरं या शिक्षिका तेवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी लाथांनीही त्याविद्यार्थ्याची धुलाई केली.
मोबाईलमध्ये केले चित्रीकरण
हा प्रकार वर्गात सुरू असताना एका विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये हे सर्व चित्रीत केले. त्या व्हीडिओत शिक्षिका विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. पुजा केदारी असे या शिक्षिकेचे नाव आहे. या व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हीडिओ संबधित मुलाच्या पालकांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस स्थानकात धाव घेतली. संबधित शिक्षिके विरोधात तक्रार केली. शिवाय संस्थेनं त्या शिक्षिकेला बडतर्फ करावे अशी मागणीही केली आहे.
शाळा कारवाई करणार का?
नुतन मराठी विद्यालयाची ओळख पुण्यातील नामांकीत शाळांमध्ये होते. सर्वात जुनी शाळा म्हणूनही तिची ओळख आहे. अशा शाळेत हा प्रकार घडल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय शाळेने तातडीने कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. दरम्यान शाळेने संबधित शिक्षिके विरोधात एनसी नोंदवली आहे. शिवाय पुढील चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या शिक्षिकेवर चौकशीनंतर काय कारवाई होते याकडे पालकांचे लक्ष आहे.