रुपेश सामंत
गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षी याला अटक केली आहे. मंत्र्याची वाट अडवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गोव्याचे पशुसंवर्धनमंत्री नीलकांत हरळणकर यांच्या गाडीची वाट अडवून त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घातल्याचा गौरववर आरोप आहे. काही वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये झळकलेल्या गौरवने मंत्र्याविरोधातही तक्रार दाखल केली आहे. मात्र मंत्र्यांतर्फे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गौरवला अटक केली आहे.
उत्तर गोव्यातील रेवरा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मंत्री हरळणकर आणि गौरव यांच्या गाड्या समोरासमोर आल्या होत्या. पुढे जायला मिळत नसल्याने गौरव संतापला होता. मंत्र्यांची गाडी बाजूला काढा म्हणून त्याने हुज्जत घातली होती. यामुळे मंत्र्यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाने उत्तर गोव्यातील कोलवळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भारतीय न्याय संहितेअंतर्गत लोकसेवकाच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गौरवविरोधात गुन्हा दाखल केला आहे.गौरव बॉम्बे बेगम्स आणि नक्सलबारी या वेबसिरीजमध्ये दिसला असून तो गोव्यामध्ये स्टार्टअप चालवतो.