Agra bank manager murder : नात्यांमधील विश्वास आणि प्रेम क्षणार्धात कसे संपुष्टात येते, याचे धक्कादायक उदाहरण एका हाय-प्रोफाइल खून प्रकरणामुळे समोर आले आहे. ज्या व्यक्तीसोबत आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली, त्याच पत्नीने मेहुण्यासोबत मिळून आपल्या पतीची निर्घृण हत्या केली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बहुचर्चित बँक व्यवस्थापक सचिन उपाध्याय यांच्या हत्याकांडात कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
या प्रकरणात कोर्टाने नृशंस हत्येप्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी आणि मेहुणा या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर सासर्याला पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
काय आहे प्रकरण?
आग्रामधील ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 ऑक्टोबर 2023 रोजी बँक व्यवस्थापक सचिन उपाध्याय यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला ही घटना आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, मृतदेहावर आढळलेल्या जखमा आणि शवविच्छेदन अहवालानंतर हे प्रकरण हत्येचे असल्याचे स्पष्ट झाले.
मृत सचिनचे वडील केशव देव (मूळ तक्रारदार) यांनी त्यांच्या मुलाची हत्या अन्य कोणी नसून त्याची पत्नी प्रियंका, मेहुणा कृष्णा रावत आणि सासरे (कलेक्टोरेट बार असोसिएशनचे अध्यक्ष) बिजेंद्र रावत यांनी संगनमताने केली आहे, अशी तक्रार केली होती.
( नक्की वाचा : Ambarnath: 'तो' एक निर्णय महागात पडला! अंबरनाथच्या निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची 45 लाखांची फसवणूक )
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सचिनला अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केली होती. मृतकाच्या वडिलांनी आरोप केला की, आरोपींनी सचिनला गरम इस्त्रीने देखील भाजले होते आणि त्यानंतर मृतदेह कुठेतरी फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याची त्यांची योजना होती, पण त्यांना संधी मिळाली नाही.
का केली हत्या?
सचिनचे लग्न 2015 मध्ये वकील बिजेंद्र रावत यांची मुलगी प्रियंकासोबत झाले होते. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू झाले होते. पत्नी प्रियंका सचिनवर कुटुंबियांपासून वेगळे राहण्यासाठी सतत दबाव टाकत होती, याच वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
15 ऑक्टोबर रोजी आग्रा न्यायालयाने या हाय-प्रोफाइल हत्याकांडात 18 साक्षीदारांची साक्ष ऐकल्यानंतर अंतिम निकाल दिला. पत्नी प्रियंका आणि मेहुणा कृष्णा रावत या दोघांनाही हत्येसाठी दोषी ठरवत आजीवन कारावासाची (Life Imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली.
( नक्की वाचा : Video: 'नवरा दारु पितो, दुसऱ्या मुलींशी बोलतो आणि सासरा...', विवाहित महिलेनं रडत-रडत उचललं टोकाचं पाऊल )
या प्रकरणात सासरे बिजेंद्र रावत यांना पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. कोर्टाचा निर्णय येताच तिन्ही दोषींना तात्काळ तुरुंगात पाठवण्यात आले.