योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) एका गंभीर प्रकरणामुळे सध्या चर्चेत आले आहे. महाविद्यालयातील एका ज्युनिअर विद्यार्थिनीच्या कथित रॅगिंगबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (NMC) थेट ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर संपूर्ण GMC प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. NMC कडून या तक्रारीबाबत विचारणा करणारा ईमेल शुक्रवारी महाविद्यालयाला मिळला. त्यानंतर GMC प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या.
NMC च्या तक्रारीनंतर तातडीची बैठक आणि चौकशी
NMC कडून ईमेल आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांनी तातडीने बैठक बोलावली. स्त्रीरोग विभागासह इतर विभागप्रमुखांची दिवसभर चर्चा झाली. तक्रारीमध्ये उल्लेख असलेल्या कनिष्ठ आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांना चौकशी समितीसमोर हजर करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेण्यात आले. मात्र, प्राथमिक चौकशीत कोणाच्याही तोंडी रॅगिंगची घटना घडल्याचे समोर आले नाही.
NMC च्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या चौकशी समितीने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. कनिष्ठ आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांनीही रॅगिंगची घटना झाल्याचे पूर्णपणे नाकारले. यामुळे हे संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. रॅगिंग झाले नसल्यास ईमेल तक्रार कशासाठी केली गेली, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
( नक्की वाचा : Akola News : अकोला महापालिकेच्या नावाने मेसेज; 10 रुपये भरले आणि महिलेचं बँक खातं रिकामं! काय आहे प्रकरण? )
GMC प्रशासनाने प्राथमिक चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची गैरप्रकाराची बाब समोर आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम यांनीही अधिकृत माहिती देताना सांगितले की, “चौकशीत कोणतीही निष्कर्षात्मक गोष्ट आढळली नाही.”
'दडपशाही'च्या चर्चांना वेग
विशेष म्हणजे, रॅगिंगचा आरोप दोन्ही पक्षांनी नाकारला असला तरी, GMC च्या कॉरिडॉरमध्ये आणि विद्यार्थी वर्तुळात दिवसभर प्रकरण दडपण्याबाबत कुजबुज सुरू होती. "जर रॅगिंग झाली नसती, तर कोणी थेट NMC कडे ईमेल तक्रार का करेल?" असा प्रश्न अनेक विद्यार्थी विचारत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला अंतर्गत दबावाची सावली आहे का, यावरही चर्चा जोर धरू लागली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे आणि दडपशाहीच्या चर्चांमुळे, तक्रारीमागील सत्यता आणि मूळ वस्तुस्थिती उघड करण्यासाठी या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.