योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Acid Attack on MPSC Student : अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अॅसिड हल्ला झाला आहे. या तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी खामगाव-अकोला रोडवर अॅसिड हल्ला करून त्याच्यावर लुटमार केली. अमोल इसाळ असं या प्रकरणातील पीडित तरुणाचं नाव आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबुळगावचा आहे. अमोलवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार,अमोल इसाळ हा तरुण अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगावमध्ये रविवारी दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी काही तरुणांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर अकोला खामगाव महामार्गावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मारहाण केली. त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल आणि इतर वस्तू हिसकावून घेत त्याच्यावर अॅसिड फेकलं. हल्ल्यानंतर आरोपींनी अमोलला रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला.
या घटनेनंतर काही नागरिकांनी तत्काळ अमोलला खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खामगावच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन काटे त्यांच्या सहकाऱ्यांनी अनोळखी व्यक्ती म्हणून अमोलला अकोल्यातील शासकीय रुग्णालयात सोमवारी हलविण्यात आले आहे.
( नक्की वाचा : कल्याणमध्ये चिमुकलीचं अपहरण अन् हत्या! खून पचला होता पण 8 महिन्यांनी मावशी-काका निघाले मारेकरी )
अॅसिड हल्ला करणारा हा रूम पार्टनर ?
दरम्यान, अमोलच्या मोठा भाऊ स्वप्निलने हा हल्ला अमोलच्या रूम पार्टनरने केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अमोल आणि त्याचा रूम पार्टनरमध्ये यांच्यात गेल्या दीड महिन्यापासून वाद सुरु होते, त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असावी, असा अंदाज आहे. अमोलने देखील हल्लेखोरांची ओळख पटवता येईल, असे सांगितले असून, "त्यांचे फोटो दाखवले गेले तर मी ओळखू शकतो," असे जखमी अवस्थेत सांगितले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेचा प्रेम प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचाही सध्या पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता अमोलला त्याचा पुढील उपचार करण्यासाठी त्याच्या मूळ गावी यवतमाळच्या बाभुळगाव येथे पाठवण्यात आलं आहे.