योगेश शिरसाट, अकोला
Akola News : अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नुकताच लग्न झालेला तरुण मनीष धनराज चव्हाण याला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनिषच्या पत्नीने याबाबत मुर्तीजापुरातील एका विवाहित महिलेवर आणि तिच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
मनिषचे दोन महिन्यांपूर्वीच अकोल्याच्या अमानतपूर गावातील त्याच्या सख्या मामाच्या मुलगी आर्नी दिनेश पवार हिच्याशी पारंपरिक पद्धतीने लग्न झाले होते. लग्नानंतर मनिष आणि आर्नी यांचा संसार सुरळीत सुरू असतानाच, मनीषची ओळख मुर्तीजापूर येथे राहणाऱ्या सीमा पवार या विवाहित महिलेबरोबर झाली.
( नक्की वाचा : Pune : घरी बसणाऱ्या नवऱ्याला जाब विचारणे जीवावर बेतले! सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील महिलेचा टोकाचा निर्णय )
अकोल्यातील मूर्तीजापुरच्या सीमा पवार हिचे चार वर्षांपूर्वी अमर पवार या तरुणाशी लग्न झाले होते. ती विवाहित असूनसुद्धा मनीषसोबत तिचे संबंध वाढले. पोलिसांमध्ये दाखल तक्रारीनुसार, सीमाने आपल्या दोन नातेवाईकांच्या मदतीने मनीष'ला पळून जाण्यास प्रवृत्त केले. मनीष आणि सीमा दोघेही बेपत्ता झाले असून, या प्रकरणात सीमासह मनीष आणि आणखी दोन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर मनीषच्या कुटुंबीयांनी व समाजातील इतर नातेवाईकांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. सध्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ करत आहेत. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण कौटुंबिक वाद असल्याचे म्हटले आहे, मात्र घटनेचा व्यापक परिणाम लक्षात घेता पोलीस अधिक तपास करत आहेत.