अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील निकाकेम कंपनीतून गुरुवारी रात्रीच्या सुमारास गॅस गळती झाली. यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात रासायनिक धूर पसरला होता. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत पाहणी केली. तर एमपीसीबीच्या कल्याण प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मात्र स्वतः न येता चक्क ड्रायव्हरला कंपनीत पाठवल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे एमपीसीबीच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच आता कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 43 वर निकाकेम प्रॉडक्ट्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत रासायनिक उत्पादन केलं जातं. गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास या कंपनीतून अचानक रासायनिक धूर अंबरनाथ शहरात पसरला. संपूर्ण अंबरनाथ शहरात पसरलेल्या या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास होऊ लागले. त्यामुळे भितीचं वातावरण निर्माण झालं. हे नक्की कशामुळे होत आहे याची कल्पना नागरिकाना येत नव्हती.
ट्रेंडिंग बातमी - पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल
याबाबत एनडीटीव्ही मराठीने बातमी प्रसारित करताच एमआयडीसी अग्निशमन दल आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही कंपनी शोधून काढली. तिथे येऊन पाहणी करत हा रासायनिक दूर थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या. तर दुसरीकडे अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण प्रादेशिक अधिकारी राजपूत यांचा फोन मात्र नॉट रिचेबल होता.
संतापजनक बाब म्हणजे त्यांनी स्वतः या ठिकाणी येणं अपेक्षित असतानाही त्यांनी आपल्या ड्रायव्हरला कंपनीत पाठवलं. या ड्रायव्हरने कंपनीचे फोटो आणि मालकाचा नंबर राजपूत यांना पाठवला. त्यानंतर तो तिथून निघून गेल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे राजपूत यांच्या या बेजबाबदार वर्तनावर संताप व्यक्त होत आहे.अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कारखाने असून तिथून सातत्याने रासायनिक वायू आणि जलप्रदूषण होत असतं. त्यामुळे या कंपन्यांवर एमपीसीबीने कठोर कारवाई करण्याची गरज आता व्यक्त होत आहे. मात्र त्यापूर्वी एमपीसीबीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी, अशीही मागणी आता होऊ लागली आहे.