Ambernath News : मुंबईजवळच्या कल्याण-डोंबिवली परिसरात ड्रग्जच्या वाढत्या प्रकरणांनंतर आता अंबरनाथमध्येही अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंबरनाथ पोलिसांनी एका कुख्यात पती-पत्नीला अटक करून त्यांच्याकडून तब्बल 2.50 लाख रुपये किमतीचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या पती-पत्नीविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नेमकं काय घडलं?
अंबरनाथ पश्चिममधील भगतसिंग नगरमध्ये अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी डीबी पथकाचे एपीआय अविनाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले. या पथकाने तात्काळ धाड टाकून शरीफ सलीम शेख आणि त्याची पत्नी आसिया शरीफ शेख या दोघांना अटक केली.
( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )
मोठा साठा जप्त
पोलिसांनी या पती-पत्नीकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 1.60 लाख रुपयांचे किमतीचे एमडी ड्रग्ज, 80,000 रुपयांचे हेरॉईन, तसेच 334 थीनर सोल्युशन आणि कफ सिरपच्या बाटल्यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची एकूण किंमत 2.50 लाख रुपये इतकी आहे.
पतीवर 21, पत्नीवर 4 गुन्हे
आरोपी शरीफ शेख हा जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा ड्रग्ज विक्रीत सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मागील काही दिवसांतील ही त्याच्यावरील तिसरी कारवाई आहे. शरीफ शेखवर यापूर्वीच 20 गुन्हे दाखल असून, सध्या दाखल झालेला हा त्याचा 21 वा गुन्हा आहे. त्याची पत्नी आसिया शेख हिच्यावरही 4 गुन्हे दाखल आहेत.
या गंभीर गुन्ह्यांमुळे आता दोघांवरही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे एसीपी शैलेश काळे यांनी सांगितले आहे.