सुनील दवंगे, प्रतिनिधी
Ashok Kharat Latest News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे भोंदूबाबा अशोक खरात याच्या फसवणुकीचे नवे धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत.श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या लाखोंच्या लुटीचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे.व्यवसायवृद्धीच्या आमिषाला बळी पडलेल्या एका व्यावसायिकालाच खरातने चक्क सोन्याऐवजी पितळाची अंगठी देत लाखोंना गंडा घातला, असा गंभीर आरोप केला जात आहे.राजेंद्र भागवत असं या व्यावसायिकाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा येथील व्यावसायिक राजेंद्र भागवत हे आपल्या व्यवसायात प्रगती व्हावी या उद्देशाने अशोक खरातच्या संपर्कात आले होते.स्वतःला अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करणाऱ्या खरातने “पुष्कराज रत्न जडलेल्या सोन्याच्या अंगठ्या घातल्यास व्यवसायात प्रचंड वाढ होते,”असा सल्ला देत भागवत यांचा विश्वास संपादन केला.
भोंदू अशोक खरातने नेमकं काय केलं?
याच विश्वासाचा गैरफायदा घेत भोंदूबाबा खरातने व्यावसायिक भागवत यांना 20 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या दिल्या त्या बदल्यात 2 लाख 62 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. मात्र, प्रत्यक्षात सोन्याच्या अंगठ्या स्वतःकडेच ठेवून भागवत यांच्या हातात पितळाच्या अंगठ्या दिल्या. श्रद्धेच्या नावाखाली केलेली ही उघड उघड फसवणूक असल्याचे समोर आले आहे.या प्रकारानंतर संतप्त झालेल्या राजेंद्र भागवत यांनी थेट विशेष तपास पथकाकडे (SIT) कडे धाव घेतली. त्यानंतर अशोक खरातविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिक तपास केला जात आहे.
नक्की वाचा >> White Leopard Video : नाशिकमध्ये खळबळ! 'या' भागात पहिल्यांदाच आढळला पांढरा बिबट्या, धडकी भरवणारा व्हिडीओ
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे
अशोक खरात प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. याआधीही जमीन व्यवहार, महिलांच्या शोषणाचे आरोप,तसेच दडपशाहीचे प्रकार समोर आलेले असताना आता आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघड होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषा धूसर होत असताना अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात किती लोक अडकले असतील?असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासन आणि तपास यंत्रणांवरही या प्रकरणात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.