Atul Subhash Case : बंगळुरुमधील एआय इंजिनिअर (AI Engineer) अतुल सुभाष यांच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का बसलाय. याबाबत मीडिया रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे खुलासे होत आहेत. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अतुल सुभाष यांनी त्यांच्या मुलासाठी एक खास गिफ्ट ठेवलं आहे. पण, हे गिफ्ट त्यानं 2038 मध्येच उघडावं अशी विनंती अतुल यांनी केलीय. अतुल यांचा मुलगा सध्या चार वर्षाचा आहे. तो 2038 साली म्हणजेच आणखी 14 वर्षांनी 18 वर्षांचा होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुसाईड नोटमध्ये मुलाचा उल्लेख
अतुल सुभाष यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये मुलासाठी खास मेसेज लिहिला आहे. त्यांनी सांगितलं की, 'मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्यासाठी मला माझा जीव द्यावा लागेल, याचा कधी विचार केला नव्हता. पण, दुर्दैवानं मी तुझ्यासाठी जीव देतोय. मला कधी-कधी एका त्रासाशिवाय तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुझा वापर मला ब्लॅकमेल करण्यासाठी होत आहे. तुझ्या माध्यमातून माझ्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातोय.
कोण आहेत अतुल सुभाष?
34 वर्षांचे अतुल सुभाष बंगळुरु शहरातील एका प्रायव्हेट फर्ममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये DGM पदावर काम करत होते. अतुल यांनी त्यांच्या मेसेजमध्ये लिहिलं की, 'मी मरणंच माझ्यासाठी चांगलं आहे. मी जे पैसे कमावतोय, त्यामुळे माझे शत्रू आणखी बळकट होत आहेत. मी कमावलेल्या पैशांचा वापर मला बर्बाद करण्यासाठी केला जातोय. माझ्याच करातून मिळालेल्या पैशांमधून हे कोर्ट, हे पोलीस आणि ही संपू्र्ण सिस्टीम मला, माझ्या कुटुंबीयांना आणि माझ्यासारख्या अनेकांना त्रास देत आहे. मी जगलो नाही तर हा पैसा देखील नसेल. माझे आई-वडील तसंच भावाला त्रास देण्याचं कोणतंही कारण शिल्लक राहणार नाही.'
( नक्की वाचा : घरगुती हिंसाचारात विवाहित महिलांपेक्षा तिप्पट पुरुषांनी दिला जीव, NCRB ची धक्कादायक आकडेवारी )
अतुलचे भाऊ विकास सुभाष यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुलचं लग्न 2019 साली झालं होतं. अतुलची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्याला अनेक खोट्या आरोपांमध्ये अडकवलं होतं. त्यामुळे अतुल खूप त्रस्त होता. याच त्रासातून त्यानं जीव दिला. पोलिसांनी या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.