Axis Bank scam : एका मोठ्या बँकेच्या तिजोरीमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका कॅशियरने चक्क Amazon सारख्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून 'मनोरंजन बँक'चे (Children Bank) म्हणजेच लहान मुलांच्या खेळण्यातील नकली नोटा मागवल्या. या नकली नोटा त्याने बँकेतील खऱ्या नोटांच्या बंडलात मिसळले आणि तब्बल 12 लाख 22 हजार 780 रुपये इतक्या मोठ्या रकमेचा अपहार केला.
हा संपूर्ण प्रकार राजस्थानमधील बालोतरा येथील अॅक्सिस बँक (Axis Bank) शाखेत घडला. हृदया यादव नावाच्या कॅशियरने ही चलाखी केली आणि बँकेतील रोकडची हेराफेरी केली. बँक व्यवस्थापनाने या घोटाळ्याचा खुलासा केल्यानंतर व्यवस्थापक मयंक जुगतावत यांनी बालोतरा पोलीस ठाण्यात आरोपी कॅशियरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी आरोपी कॅशियरला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
कसा उघड झाला गुन्हा?
बँक मॅनेजरने 19 नोव्हेंबर रोजी रोख रकमेची पडताळणी करण्याची नियमित प्रक्रिया सुरू केली. या पडताळणीदरम्यान सुरुवातीला तिजोरीतील रोकडमध्ये 71 हजार रुपये कमी असल्याचे आढळले. मॅनेजरने कॅशियर यादव यांना याबाबत विचारणा केली, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची गडबड झाल्याचा इन्कार केला. मॅनेजरचा संशय वाढल्याने त्यांनी अधिक कठोरपणे विचारणा केली. तेव्हा कॅशियरने कबूल केले की, त्याने ही रक्कम रिफायनरीमध्ये काम करणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीला दिली होती आणि ती दुसऱ्या दिवशी परत करणार आहे.
( नक्की वाचा : D-Mart News : डी-मार्टचा कर्मचारीच निघाला 'चोर'; बारकोड स्कॅन होताच किंमत व्हायची कमी, काय आहे घोटाळा? )
कॅशियरच्या उत्तराने बँक मॅनेजरचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे त्यांनी तिजोरीतील रोख रकमेची अधिक गांभीर्याने तपासणी केली. यावेळी त्यांना 500 रुपये आणि 100 रुपये च्या नोटांच्या बंडलांमध्ये 'चिल्ड्रन बँक'चे नकली नोट मिसळलेले आढळले. बँकेने केलेल्या अधिक तपासणीत एकूण 12 लाख 22 हजार 780 रुपये इतकी मोठी रक्कम कमी असल्याचे निश्चित झाले. यानंतर पोलिसांनी अधिक कडक भूमिका घेत चौकशी केली असता, कॅशियरने या अपहाराची कबुली दिली.
कुठे उधळले पैसे?
पोलिसांनी कॅशियरची चौकशी केली असता, त्याने गबन केलेल्या रकमेचा उपयोग कशासाठी केला याची माहिती दिली. त्याने सांगितले की, सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली आदित्य नावाच्या एका व्यक्तीला ही रक्कम दिली, तसेच काही पैसे ऑनलाइन गेम खेळण्यात उधळले. आता पोलीस आरोपी कॅशियरच्या बँक खात्याची तपासणी करत आहेत, ज्यामुळे रोख व्यवहारांची संपूर्ण कहाणी समोर येईल.
( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवली हादरली! पलवा सिटीजवळ सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितलं? )
विशेष म्हणजे, कॅशियरने हे नकली नोट चक्क ऑनलाइन शॉपिंगद्वारे मागवले होते. त्याने सांगितले की, Amazon वरून त्याने 500 रुपये आणि 100 रुपये चे चिल्ड्रन बँक नोट मागवले होते. नोटांची तपासणी केल्यावर हे उघड झाले की, त्याने 500 रुपये च्या बंडलामध्ये 100 रुपये चे नकली नोट मिक्स केले होते. 500 रुपये चे नकली नोट येण्यापूर्वीच त्याचा हा घोटाळा उघडकीस आला.