Teen Kills 34-Year-Old Bengaluru Techie : एका 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेचा संशयास्पद मृत्यू होतो आणि सुरुवातीला हे केवळ आगीमुळे गुदमरून झालेला अपघात असल्याचे वाटते. मात्र जेव्हा पोलीस तपासाची चक्रे फिरतात, तेव्हा एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक गुन्ह्याचा उलगडा होतो. ज्या तरुणीला तंत्रज्ञानाच्या जगात मोठे भविष्य होते, तिचा अंत एका 18 वर्षांच्या तरुणाच्या विकृत हव्यासापोटी झाला. हा केवळ अपघात नसून एका वासनांध तरुणाने केलेला क्रूर खून असल्याचे आता समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
तपास यंत्रणांनी वैज्ञानिक पुरावे आणि तांत्रिक तपासाचा आधार घेत या प्रकरणाचे गूढ उकलले आहे. ही संतापजनक घटना बंगळुरू शहरातील राममूर्ती नगर येथील सुब्रमणी लेआउटमध्ये घडली आहे. 34 वर्षीय शर्मिला डीके या आयटी क्षेत्रातील एक्सेंचर कंपनीत कामाला होत्या. 3 जानेवारी रोजी त्यांच्या भाड्याच्या घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला लागलेल्या आगीमुळे त्यांचा श्वास गुदमरला असावा असा अंदाज वर्तवला जात होता, पण सत्य काही वेगळेच होते.
( नक्की वाचा : 'ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी तिला संपवलं', पहिल्या महिला ऑटो ड्रायव्हरच्या हत्या प्रकरणात मोठं रहस्य उघड )
लज्जास्पद मागणी आणि झटापट
शर्मिला यांच्या घराजवळच राहणाऱ्या कर्नाल कुराई या 18 वर्षांच्या तरुणाने या कृत्याची कबुली दिली आहे. 3 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास त्याने खिडकीतून शर्मिला यांच्या घरात प्रवेश केला. त्याने त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
शर्मिला यांनी या मागणीला ठामपणे विरोध केला, तेव्हा कर्नाल हिंसक झाला. त्याने शर्मिला यांचे तोंड आणि नाक जोराने दाबून धरले, ज्यामुळे त्या अर्धवट बेशुद्ध झाल्या. या झटापटीत त्यांना गंभीर जखमा होऊन रक्तस्त्राव देखील झाला होता.
घराला लावली आग
केलेला गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने एक भयंकर योजना आखली. शर्मिला बेशुद्ध पडल्यानंतर त्याने त्यांचे कपडे आणि इतर वस्तू बेडवर एकत्र केल्या आणि त्यांना आग लावून दिली. त्याला वाटले की आगीत सर्व पुरावे जळून खाक होतील आणि हा एक अपघात वाटेल.
आरोपीनं पळून जाताना शर्मिला यांचा मोबाईल फोनही सोबत नेला. मात्र तांत्रिक तपासात पोलिसांना कर्नालवर संशय आला आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
( नक्की वाचा : रेल्वेत भेटला तृतीयपंथीय, प्रेमात पडला आणि लग्नही झालं,पण... एका ट्विस्टनं सारंच संपलं )
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) म्हणजे खून, 64(2), 66 आणि 238 म्हणजेच पुरावे नष्ट करणे यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र आता खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेने परिसरात आणि आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.