अभय भूते
काही कारणामुळे अनेकांची लग्न होत नाही. त्यामुळे ते निराश होतात. निराशेच्या गर्तेत ते चुकीचं पाऊल उचलतात. अशी अनेक उदाहरणे समोर आहेत. पण भंडारा जिल्ह्यात लग्न होत नाही म्हणून एका तरुणाने चक्क आपल्या जन्मदात्या वडीलांचाच खून केला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याने लग्न होत नाही म्हणून वडिलांचा खून का केला या मागचे कारण तर सर्वांनाच थक्क करणारे आहे. या प्रकरणी या तरुणाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात घडली आहे. प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार हा तरुण लाखांदूरमध्ये राहात होता. त्याचे वय 33 वर्षे होते. गेल्या पाच सहा वर्षापासून तो लग्नासाठी मुलगी पाहात होता. पण त्याचं लग्न काही जुळत नव्हतं. त्यामुळे तो संतापला होता. त्याचे त्याच्यावर नियंत्रण राहीले नव्हते. इतक्या वर्षांपासून लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे संतापलेल्या मुलाने स्वतःच्या वडिलांशी वाद घातला. तुमच्यामुळे माझं लग्न होत नाही असा त्याचा दावा होता. तुम्ही माझ्यासाठी काय केलं. ना नोकरी पाहीली नाही शेती दिली. त्यामुळे माझ्या हाती काही नाही. त्यामुळेच मला मुली मिळत नाही असा त्याचा दावा होता.
यावरून त्याने आपल्या वडीलां सोबत भांडण काढलं होतं. भांडण इतकं वाढलं की त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांवरच हात उचलला. त्यांना त्यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना लाखांदूरच्या आथली गावात घडली. या मारहाणीत पुरुषोत्तम कुंभलवार यांचा मृत्यू झाला. त्यांचे वय 51 वर्षे होते. या प्रकरणी आपल्या मुला विरोधात आईने पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार याच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
रात्री मृतक,आरोपी मुलगा आणि फिर्यादी पत्नी तिघेही घरी जेवण करून बसले होते. यावेळी आरोपी मुलाने स्वतःच्या लग्नाबाबत वडिलांशी वाद घातला. मागील काही वर्षांपासून लग्नासाठी मुलगी न मिळाल्यामुळे संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यावर विटेचा तुकडा फेकून मारला. रक्तबंबाळ अवस्थेत पतीला पाहून पत्नीने तत्काळ स्थानिक तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे धाव घेत रुग्णवाहिका मागवली. काही वेळानंतर जखमीला लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर पत्नीने तत्काळ लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध पित्याच्या खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.