कुणाला कधी कसल्या गोष्टीचा राग येईल याचा नेम नाही. पण हा राग किती टोकाचा असेल याचा कुणी अंदाजही करणार नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीने भाजीसाठी मोठा बटाटा कापला म्हणून पतीला राग आला. त्याने त्या रागाच्या भरात कसला ही विचार न करता पत्नीचाच गळाच कापला. या घटनेनं सर्वच जण हादरले आहेत. ही घटना बिहारच्या मधूबनी इथं घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बिहार मधूबनी या ठिकाणी रतीलाल यादव आणि सोनी देवी हे दाम्पत्य राहात होते. त्यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा महिन्याचा मुलगा ही होता. नेहमी प्रमाणे रतीलालची पत्नी सोनी देवी जेवण करत होती. त्यावेळी भाजीसाठी तिने बटाटे घेतले. त्यातला मोठा बटाटा तिने कापला. यावरून पतीचा राग अनावर झाला. छोटा बटाटा का कापला नाहीस? मोठा बटाटा का कापला असं विचारत त्याने पत्नी सोनी देवीचाच गळा कापला.
गळा कापल्याने 25 वर्षीय सोनी देवीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रतीलाल याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तो मृतदेह तो जाळणार होता. त्यासाठी काही लोकांनी त्याला मदत ही केली. याची भनक पोलिसांना लागली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोनी देवीची बॉडी ताब्यात घेतली. त्यानंतर शवविच्छेदानासाठी ती पाठवण्यात आली. पोलिस अधिकारी राज किशोर पंडीत यांनी ही माहिती दिली आहे.
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पती रतीलाल याला ताब्यात घेतले आहे. शिवाय ज्यांनी सोनी देवीचा मृतदेह जाळण्यासाठी मदत केली त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्या वेळी या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी रतीलाल याने धक्कादायक सत्य सांगितले. मोठा बटाटा कापण्याचा आपल्याला राग आला. त्या रागातून आपण पत्नीचा खून केला असे त्यांने चौकशीत सांगितले. त्याचे हे कारण ऐकून पोलिसही हैराण आहेत.