Friday Namaz : 30 वर्षांची प्रथा रोखली आणि बुलढाण्यात नमाज पठणाच्या वेळी मोठा राडा, नेमकं काय घडलं?

Buldhana News: बुलढाणा शहरात आज दुपारी (शुक्रवार, 10 एप्रिल 2026) जुम्मे की नमाजच्या वेळी एकाच समाजातील दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Buldhana News: 30 वर्षांची प्रथा रोखली आणि हा राडा सुरु झाला.
बुलढाणा:

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana News: बुलढाणा शहरात आज दुपारी (शुक्रवार, 10 एप्रिल 2026) जुम्मे की नमाजच्या वेळी एकाच समाजातील दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. नमाज नेमका कोण पढवणार, या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हिंसक घटनेत दोन्ही गटातील एकूण 8 जण जखमी झाले असून, त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

नमाज पठणावरून वादाची ठिणगी

मिळालेल्या माहितीनुसार, इकबाल चौकातील जामा मशीदच्या ट्रस्टमध्ये मागील 3 वर्षांपासून अंतर्गत वाद सुरू आहेत. हाफीज रहमत हे गेल्या 30 वर्षांपासून या मशिदीत नमाज पठण करत आहेत. मात्र, आता त्यांचे वय झाले असून ते वारंवार आजारी असतात, असे कारण देत मशीद ट्रस्टचे ट्रस्टी इलियास कच्ची यांनी त्यांना नमाज पठणापासून रोखण्याचा निर्णय घेतला होता. 

Advertisement

ट्रस्टच्या या निर्णयाला परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. जामा मशीद ही सर्वांसाठी असून तिथे कोणत्याही एका समुदायाची मक्तेदारी नसावी, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती.

( नक्की वाचा : Pune News : 25 लाख रुपये, बुधवार पेठेची रुम आणि एक कपल... रुपाली ठोंबरेंच्या आरोपानं पुण्यात खळबळ! )
 

दुपारच्या नमाजच्या वेळी प्रत्यक्ष राडा

शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जेव्हा जुम्मे की नमाजची वेळ झाली, तेव्हा हाफीज रहमत नमाज पठणासाठी आले असता ट्रस्टच्या वतीने त्यांना विरोध करण्यात आला. मशिदीच्या आत हा वाद सुरू असतानाच बाहेर दोन गट आमनेसामने आले. बघता बघता वादाचे रूपांतर दगडफेक आणि लाठीमारा मध्ये झाले.मुश्ताक मन्यार आणि त्यांच्यासोबत असलेल्या 20 ते 25 जणांच्या टोळीने हल्ला केल्याचा आरोप जखमी कुरेशी कुटुंबाने केला आहे. या मारहाणीत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले असून परिसरात मोठी धावपळ उडाली.

या भीषण हाणामारीत दोन अल्पवयीन मुलांसह एकूण 8 जण जखमी झाले आहेत. यामध्ये नाजीम कुरेशी वय 14, शेख साबीर शेख अफसर वय 45, शेख मोईन शेख आकिब वय 22, शेख उमर शेख जाकीर वय 21, शेख आदिब शेख साबिर वय 16, जाकीर शेख अफसर वय 50 आणि सैय्यद तौफिक वय 28 यांचा समावेश आहे.

( नक्की वाचा : New District : राज्याला मिळणार 37 वा जिल्हा! कोणता आणि कधी? सरकारच्या एका निर्णयानं चर्चेला उधाण )

या सर्व जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. सुरुवातीला वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला, परंतु जमाव हिंसक झाल्याने पोलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. पोलिसांची जादा तुकडी दाखल झाल्यानंतर इकबाल चौकातील स्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मशिदीच्या ट्रस्टचा अंतर्गत वाद आता रस्त्यावर आल्याने शहरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
 

Topics mentioned in this article