अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर:
Chandrapur Kidney Racket: एका कर्जबाजारी शेतकऱ्याच्या हतबलतेतून सुरू झालेला किडनी रॅकेटचा तपास आता देशातील एका मोठ्या वैद्यकीय गुन्हेगारीच्या विळख्यापर्यंत पोहोचला आहे. चंद्रपूरच्या एका शेतकऱ्याने किडनी विकल्याच्या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी तमिळनाडूतील त्रिची येथून चालणाऱ्या एका आंतरराज्य किडनी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोविदनस्वामी आणि दिल्लीचे डॉ. रवींद्रपाल सिंग यांची नावे निष्पन्न झाली असून, या रॅकेटचे जाळे देशभरात पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.
किडनी रॅकेटबाबत खळबळजनक खुलासा....!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी चंद्रपूरमधील रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकारी कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी मोहाली येथून हिमांशू भारद्वाज याला ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे, अटकेत असलेल्या हिमांशूची स्वतःचीही किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या धाग्यादोऱ्यांनी पोलिसांना थेट तमिळनाडू गाठण्यास भाग पाडले.
Navi Mumbai : निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत खळबळ! पंजाबच्या 25 आरोपींना केली अटक, काय आहे प्रकरण?
तमिळनाडू कनेक्शन उघडकीस...
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट अत्यंत संघटितपणे कार्यरत होते. श्रीमंत रुग्णांकडून किडनी प्रत्यारोपणासाठी ५० ते ८० लाख रुपये उकळले जात असत. मात्र, किडनी देणाऱ्या गरीब व्यक्तीला किंवा शेतकऱ्याला केवळ ५ ते ८ लाख रुपये देऊन त्याची बोळवण केली जात होती. मानवी अवयवांच्या तस्करीचा हा व्यवसाय किती अघोरी आहे, हे यावरून स्पष्ट होते.
दरम्यान, त्रिची येथील प्रसिद्ध रुग्णालयात हे शस्त्रक्रिया पार पाडल्या जात होत्या. या प्रकरणाचा अधिक तपास आता अंमलबजावणी संचालनालय (ED) किंवा सीबीआयकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण यामध्ये कोट्यवधींच्या आर्थिक उलाढालीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.