राहुल कांबळे
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसर हे शहराचे महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र आहे. एकीकडे झगमगाट, टॉवर्स, शासकीय कार्यालयांची रांग, तर दुसरीकडे एका शांतशीर सोसायटीत, ‘धर्म आणि देवाच्या' नावावर चालवलेला धक्कादायक फसवणुकीचा खेळ. या खेळात शिकार ठरतो एक मध्यमवर्गीय वकील. त्याचा गुन्हा काय? फक्त एवढाच की तो अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकतो. या जाळ्यात अडकल्यानंतर त्याला तब्ब्ल 20 लाखांचा गंडा घातला जातो. या सर्व प्रकाराची सुरूवात 19 जुलैपासून झाली. हा संपूर्ण प्रकारच धक्कादायक आणि सर्वांनाच हादरवणार आहे.
धरमवीर सत्यनारायण त्रिपाठी हे मीरारोडचे रहिवाशी आहेत. त्यांचे वय 42 वर्ष आहे. विशेष म्हणजे ते पेशाने वकील आहेत. ते एका भोदू बाबाच्या संपर्कात आले. त्याच्याच माध्यमातून त्यांना तंत्रमंत्राच्या सहाय्याने पैसे डबल करता येतात हे समजले. सुरुवातीला त्रिपाठी यांना यावर विश्वास बसला नाही. पण प्रेमसिंग नावाच्या साधू महाराजाने सतत संपर्क ठेवत त्यांचा विश्वास संपादीत केला. पैसे डबल होतात हे त्याने धरमवीस यांना पटवून दिले. 19 जुलै रोजी भोंदूबाबाने प्रथम पूजाविधी मीरारोड येथील त्रिपाठी यांच्या राहत्या घरी करण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्व तयारी झाली होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्याने एका अज्ञात दोषाचा उल्लेख केला. “इथल्या जागेचा वास खराब आहे, तंत्र मारेल. माझ्या मित्राच्या ओळखीचं एक जागृत घर आहे, सीबीडी बेलापूरला तिथे पूजा करूया.” असं त्याने सुचवलं.
त्या भोंदूबाबाचे बोलणे ‘आध्यात्मिक' वाटले आणि त्रिपाठी यांनी होकार दिला. 22 जुलै 2025 सायंकाळी 6 वाजता, सीबीडी बेलापूर सेक्टर 4 बी मधील गोमती को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅट नंबर 2/1 मध्ये पूजा सुरू झाली. हा फ्लॅट अनंत रामचंद्र नरहरी नावाच्या व्यक्तीच्या नावावर होता. जो आरोपी नंबर 2 आहे. त्या भोंदूबाबाने पूजा सुरू केली. घरात लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो लावले गेले. त्रिपाठी यांना सांगितले गेले की, पूजा यशस्वी होण्यासाठी त्यांच्या जवळील संपूर्ण रक्कम 20 लाख रुपये, ही लक्ष्मीमातेच्या चरणी अर्पण करावी लागेल. त्यानुसार, 500 रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवण्यात आली.
त्यानंतर साधूने त्यांना दुसऱ्या खोलीत पाठवले. पुढे ‘लक्ष्मीदेवाय नमः' हा मंत्र जपत पांढऱ्या कापडावर लवंग टाकत राहण्याचे निर्देश दिले. मंत्र-जपात व्यस्त असताना त्या भोंदूबाबाने हॉलमधून नोटांनी भरलेली बॅग उचलली आणि फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद करून पळून गेला. दोन तासांनी त्रिपाठी यांना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. त्यांनी जोरजोरात दार ठोठावले. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून दरवाजा उघडून दिला. तोपर्यंत तो भोंदू बाबा गायब झाला होता. आतापर्यंत साठवलेली पुंजी म्हणजेच 20 लाख रुपये ते गमावून बसले होते.
त्रिपाठी यांनी तत्काळ सीबीडी पोलिस ठाणे गाठले. तक्रारीनंतर पोलिसांनी नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रेमसिंग साधू महाराज आणि अनंत रामचंद्र नरहरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलिस तपास करत आहेत. दोघेही सध्या फरार आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नारायण पालमपल्ले, यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. घटनास्थळ सीसीटीव्ही, मोबाइल लोकेशन, आणि परिसरातील माहितीचा आधार घेत पोलिस आरोपीचा माग काढत आहेत. पोलिसांनी सांगितले की, या भोंदू बाबाच्या जाळ्यात आणखी काही जण अडकले असल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकारामध्ये फक्त पैशाची फसवणूक नाही तर विश्वासाचा गळा घोटला गेला आहे.