Dharavi News : धारावीकरांच्या जीवाशी खेळ, IMA च्या माजी अध्यक्षांचा गौप्यस्फोट! उपायही सांगितला

जाहिरात
Read Time: 3 mins
धारावीकरांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार उघड झाला आहे. (प्रातिनिधिक फोटो)
मुंबई:

मुंबईच्या मध्यवर्ती भागात असूनही गेल्या अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या धारावीबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दाट लोकवस्तीच्या धारावीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, चुकीच्या उपचारांमुळे दरवर्षी सुमारे 4% ते 5% रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो, असा गौप्यस्फोट इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी अध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर  यांनी केला आहे. 40 वर्षे धारावीत रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. पाचनेकर यांनी बोगस डॉक्टरांविरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली असून शिक्षण,जनजागृती आणि भविष्यातील पुनर्विकासामुळे बोगस डॉक्टरांचा प्रश्न लवकरच निकाली लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

धारावीत 1985 पासून खासगी दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर पाचनेकर यांच्या मते अज्ञानासोबतच धारावीकरांची बेताची आर्थिक स्थिती हे बोगस डॉक्टरांच्या समस्येचे मूळ कारण आहे.

Advertisement

काय आहे पद्धत?
 

'धारावीत खासगी दवाखान्यातील डॉक्टरांकडून सुमारे 150 ते 300 रुपये प्रति रुग्ण इतका दर आकारला जातो. याउलट बोगस डॉक्टर फक्त 50 ते 100 रुपयांत जुजबी उपचार करतात. यामुळेच सामान्य धारावीकर या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यात अडकतो. सर्दी,ताप, अंगदुखी अशा तक्रारी असणाऱ्या सर्वच रुग्णांना, बोगस डॉक्टर सर्रास अँटिबायोटिकचे इंजेक्शन  ठोकून  मोकळे होतात. या इंजेक्शमुळे होणारे दुष्परिणाम किंवा रुग्णाला कसली एलर्जी आहे का? याबाबत हे बोगस डॉक्टर्स बिलकुल विचार करत नाहीत. 

इंजेक्शनमुळे पेशंटला तात्पुरती तरतरी येते. थोडं बरं वाटतं. सुमारे 90% रुग्णांना तात्पुरता आराम मिळतो. मात्र, अशा चुकीच्या उपचारांमुळे 10 टक्के  रुग्णांना आरोग्यविषयक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. अशावेळी हे बोगस डॉक्टर हात वर करून मोकळे होतात" अशा शब्दांत डॉक्टर पाचनेकर  यांनी या गंभीर समस्येची  माहिती दिली.

Advertisement

( नक्की वाचा : Dengue : पावसाळ्यात डेंग्यूपासून संरक्षण कसे करणार? 'या' पद्धतीनं घ्या काळजी )
 

चुकीच्या उपचारांमुळे होणाऱ्या गुंतागुंतीच्या आरोग्यविषयक तक्रारी घेऊन बऱ्याचदा धारावीकर रात्री अपरात्री देखील माझ्याशी संपर्क साधतात. त्यावेळी त्यांच्यावर योग्य ते उपचार करून मी त्यांचे समुपदेशनही करतो. मात्र, माझ्या वैयक्तिक प्रयत्नांना काही मर्यादा आहेत,' असंही त्यांनी सांगितलं.

Advertisement

काय आहेत उपाय?

डॉ. पाचनेकर यांनी पुढे सांगितलं की, मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलिसांनी एकत्रितपणे मोहीम राबविल्यास बोगस डॉक्टरांना धारावीतून कायमचे हद्दपार करणे शक्य होईल. तसेच याविषयी स्थानिक पातळीवर जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

 'धारावीचा पुनर्विकास झाल्यास बोगस डॉक्टरांना आळा बसू शकेल, असं मला वाटतं. कारण बहुतांशी बोगस डॉक्टर्स यांचे दवाखाने भाडे तत्वावरील जागेत असून, पुनर्विकासानंतर त्या जागेचे मूळ मालक या डॉक्टरांना हुसकावून लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या माध्यमातून या गंभीर समस्येला रोखता येईल' असे स्पष्ट मत डॉ. पाचनेकर यांनी मांडले.

'पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेक प्रतिथयश डॉक्टर्स धारावीत प्रॅक्टिस करायला पुढे येत नाहीत. मात्र, इथे पुनर्विकास होऊन दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास भविष्यात हे चित्र बदलू शकेल" असा विश्वास पाचनेकर यांनी व्यक्त केला.

अंडरवर्ल्डमधूनही धमक्या

 गेल्या 4 दशकांपासून धारावीत रुग्णसेवा करणारे डॉ. अनिल पाचनेकर हे इंडियन मेडिकल असोसिएशन च्या मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष असून , त्यांनी महाराष्ट्र मेडिकल कौंसिल वर देखील सुमारे दोन दशके काम केले आहे.  90 च्या दशकाच्या पूर्वार्धात देखील त्यांनी धारावीतील बोगस डॉक्टरांच्या विरोधात लढा उभारला होता. यामुळे 10 बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई देखील झाली. त्याकाळी त्यांनी बोगस डॉक्टरांची एक यादीच बनवली होती. दुर्दैवाने, त्या यादीतील माहिती बाहेर आली आणि  त्याकाळी अंडरवर्ल्डच्या धमक्या आल्याची माहिती देखील डॉ. पाचनेकर यांनी दिली.

 'बोगस डॉक्टरांच्या विरोधातील हा लढा मी सुरुवातीपासून लढत असून यापुढे देखील धारावीकरांना योग्य आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन" असे पाचनेकर यांनी सांगितले.
 

Topics mentioned in this article