Dhule:' नगरसेवक आहोत' म्हणत पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न, पण भाजपा नेत्याच्या एका फोनने खुनाचा आरोपी जाळ्यात

Dhule Police Action : भाजपा नेत्याच्या एका फोनमुळे श्रीरामपूरमधील एका खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dhule Police : . काळ्या काचांच्या कारचा वापर अनेकदा गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जातो. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Shrirampur Murder Accused Caught Dhule : मालेगावहून धुळ्याच्या दिशेने सुसाट सुटलेली एक संशयास्पद फॉर्च्युनर कार, नंबर प्लेटचा पत्ता नाही आणि पूर्णपणे काळ्या फिल्मने झाकलेल्या काचा... एखाद्या फिल्मी सीनप्रमाणे वाटणारा हा प्रसंग धुळे हायवेवर प्रत्यक्षात घडला. भाजपचे सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या तीक्ष्ण नजरेने या कारमधील संशयास्पद हालचाली टिपल्या आणि त्यांच्या एका फोनमुळे श्रीरामपूरमधील एका खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

संशय आला अन् 112 वर कॉल फिरवला

अजित चव्हाण हे कौटुंबिक दुःखद प्रसंगामुळे धुळ्याकडे जात असताना त्यांना हायवेवर एक गडद काळ्या रंगाची फॉर्च्युनर कार दिसली. या कारला नंबर प्लेट नव्हती आणि ती अत्यंत बेदरकारपणे इतर वाहनांना ओव्हरटेक करत होती. 

अनेक वर्षे पत्रकारितेचा अनुभव असल्याने चव्हाण यांना तातडीने संशय आला की, या कारमधून कोणाचे अपहरण झाले असावे किंवा काहीतरी गंभीर प्रकार सुरू आहे. त्यांनी वेळ न घालवता तातडीने 112 या पोलीस हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला आणि गाडीचे लोकेशन कळवले.

( नक्की वाचा : राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच! )
 

 हायवेवर थरार आणि आरोपीचा पाठलाग

अजित चव्हाण यांच्या तक्रारीनंतर 112 हेल्पलाइनने तात्काळ धुळे ग्रामीण पोलिसांना मेसेज पाठवला. आर्वी येथील परीक्षा केंद्रावर ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी विलास बागुल यांना हा कॉल मिळताच त्यांनी हायवेवर सापळा रचला. काही वेळातच ती संशयास्पद कार तिथे पोहोचली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कारमधील लोकांनी आम्ही नगरसेवक आहोत असे सांगून तपासणी टाळण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

मात्र, पोलीस कर्मचारी बागुल आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. पोलिसांचा हिसका दिसताच गाडीतील चालक आणि इतर साथीदार आपल्या एका मित्राला रस्त्यावरच सोडून गाडी घेऊन उलट्या दिशेने मालेगावकडे पसार झाले. सोडून दिलेला तो इसमही पळू लागला, पण विलास बागुल यांनी तब्बल 1.5 किलोमीटर पाठलाग करून त्याला झडप घालून पकडले.

धक्कादायक खुलासा

पकडलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव राहुल धुमाळ असल्याचे समोर आले. हा व्यक्ती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका खूनाच्या गुन्ह्यातील क्रमांक 1 चा फरार आरोपी निघाला. विशेष म्हणजे, हे सर्व आरोपी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून थेट उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र, दर्शनापूर्वीच अजित चव्हाण यांची सतर्कता आणि पोलीस कर्मचारी विलास बागुल यांच्या धाडसामुळे हा फरार आरोपी गजाआड झाला.

Advertisement

112 हेल्पलाइन ठरली गेम चेंजर

या संपूर्ण घटनेनंतर अजित चव्हाण यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून 112 हेल्पलाइनच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. काळ्या काचांच्या कारचा वापर अनेकदा गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जातो, त्यामुळे नागरिकांनी अशा संशयास्पद वाहनांबाबत सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. श्रीरामपूर पोलीस आता या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी धुळ्याकडे रवाना झाले असून, धुळे पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 

Topics mentioned in this article