Disha Patani House Firing Incident: बरेली येथे अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात सहभागी असलेले दोन्ही आरोपी गाझियाबादमध्ये झालेल्या एका चकमकीनंतर ठार झाले आहेत. यूपी एसटीएफच्या नोएडा युनिट आणि दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या संयुक्त पथकाने गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी पोलीस स्टेशन परिसरात ही चकमक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान दोन्ही गुंड गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या गुंडांवर बरेली येथे दिशा पटानीच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केल्याचा आरोप होता. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये गुंड गोल्डी बराड आणि रोहित गोदाराच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याने हे प्रकरण चर्चेत आले होते. पोलिसांनुसार, ठार झालेले गुंड याच टोळीशी संबंधित होते आणि अनेक इतर गुन्हेगारी घटनांमध्येही त्यांचा सहभाग होता.
पोलिसांनी चकमकीत ठार झालेल्या शूटरकडून काही महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये गोळीबारासाठी वापरलेली तीच अपाचे बाईक समाविष्ट आहे. याशिवाय, त्यांच्याकडून एक झिगाना पिस्तूल, एक ग्लॉक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे (cartridges) देखील जप्त करण्यात आली आहेत.
( नक्की वाचा : Asia Cup 2025: आशिया कपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! पाकिस्तानची बहिष्काराची भाषा आणि पुन्हा.... )
काय होते प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीमधील घराबाहेर 12 सप्टेंबर रोजी गोळीबार झाला होता. रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार या गुन्हेगारी टोळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. संत प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केल्यामुळे हा गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला होता.
"ही तर फक्त एक झलक आहे. जर पुन्हा कधी दिशाने किंवा इतर कोणत्याही कलाकाराने आपल्या धर्माचा अपमान केला, तर त्यांना जिवंत सोडले जाणार नाही." ही धमकी केवळ दिशा पाटनीसाठी नसून, संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी असल्याचा इशाराही गुन्हेगारांनी दिला होता.