Dombivli News : एकेकाळी 'सुसंस्कृत शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीला सध्या वाढत्या गुंडगिरीचा कलंक लागला आहे. शहरातील गुंडांच्या त्रासाला कंटाळून एका मराठी उद्योजकाला आपला पेट्रोल पंप नाईलाजाने रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे उद्योजक सत्ताधारी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार राजेश मोरे यांचे चुलत भाऊ आहेत. या उद्योजकाने बॅनर लावून आपली व्यथा मांडल्यामुळे डोंबिवलीतील रात्रीच्या परिस्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डोंबिवली पश्चिममधील राजू नगर-गणेश नगर परिसरात सुरेश मोरे यांचा हा पेट्रोल पंप आहे. येथील वाढत्या गुंडगिरीमुळे पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. यामुळे सुरेश मोरे यांना रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पंप बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
काय आहे कारण?
पेट्रोल पंपावर लावलेल्या एका बॅनरमुळे ही संपूर्ण घटना उघडकीस आली आहे. या बॅनरवर पेट्रोल पंप रात्रीच्या वेळेस बंद ठेवण्याचे कारण स्पष्टपणे देण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी येथे येणारे मद्यधुंद तरुण पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देतात.या कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करणे, त्यांना मारहाण करणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत.
या वाढत्या त्रासाला आणि सुरक्षेच्या समस्येला कंटाळून पंपचालक सुरेश मोरे यांनी हा कठीण निर्णय घेतला आहे. मोरे यांनी त्यांची ही व्यथा बॅनर लावून मांडल्यामुळे हा विषय सध्या डोंबिवलीमध्ये चर्चेचा केंद्र बनला आहे.
सुसंस्कृत शहराच्या प्रतिमेला तडा!
डोंबिवली शहराने आजपर्यंत अनेक साहित्यिक, कलाकार, खेळाडू आणि विचारवंत दिले आहेत. त्यामुळे त्याची ओळख एक सुसंस्कृत शहर म्हणून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
एकाकाळी डोंबिवलीत गँगवॉरचा काळ होता, ज्यात अनेक जणांचा बळी गेला. कालांतराने परिस्थिती बदलली, परंतु आता शहरात वाढलेली ही अराजकता आणि गुन्हेगारी शहरातील सुसभ्य प्रतिमेला धक्का देत आहे. एका पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी होणारे प्रकार हे शहराच्या रात्रीच्या वास्तविक स्थितीचे एक जिवंत उदाहरण आहे.