Surendra Patil Arrested : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी रिल तयार करणाऱ्या एका कुख्यात रिलस्टारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एकविरा देवीच्या जत्रेदरम्यान कमरेला पिस्तूल लावून रिल तयार करणे या रिलस्टारला भलतेच महागात पडले आहे. कल्याण क्राईम ब्रँचने केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, रिलच्या नादात हा गुन्हेगार आता पुन्हा एकदा कोठडीच्या आड गेला आहे.
रिलची हौस आणि पोलिसांचा छापा
डोंबिवलीतील कुख्यात रिलस्टार सुरेंद्र पाटील हा अवघ्या 15 दिवसांपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटून बाहेर आला होता. बाहेर आल्यावर तो लोणावळ्यातील एकविरा देवीच्या जत्रेला गेला. तिथे त्याने आपल्या मित्रांसोबत एक रिल तयार केली, ज्यामध्ये त्याच्या कमरेला पिस्तूल स्पष्टपणे दिसत होते.
ही रिल सोशल मीडियावर व्हायरल होताच कल्याण क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, अधिकारी सर्जेराव पाटील, गुरुनाथ जरक आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सुरेंद्र पाटील याच्या घरावर छापा टाकला.
( नक्की वाचा : Kalyan News: 500 पाहुणे येणार अन् हॉलला टाळे! कल्याणमध्ये पालिकेच्या कारवाईने उडाला एकच गोंधळ )
शू स्टँड उघडताच पोलीसही चक्रावले
पोलिसांनी सुरेंद्रच्या घराची कसून झडती घेतली, मात्र सुरुवातीला त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तपास सुरू असतानाच एका पोलीस कर्मचाऱ्याची नजर घरातील एका कोपऱ्यात असलेल्या शू स्टँडवर गेली. हे स्टँड काहीसे वेगळे वाटल्याने पोलिसांनी ते उघडून पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून पोलीसही अवाक झाले.
चपला आणि बूट ठेवण्याच्या त्या स्टँडमध्ये शस्त्रांचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आला होता. रिल करण्यासाठी आणि आपली हौस पूर्ण करण्यासाठी सुरेंद्रने ही सर्व शस्त्रे तिथे दडवून ठेवली होती.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवली-दुर्गाडी रिंग रोड रखडणार? 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही 'या' अजब कारभाराचा फटका )
शस्त्रांचा मोठा साठा जप्त
या कारवाईत पोलिसांनी सुरेंद्र पाटील याच्याकडून मोठ्या प्रमाणावर घातक शस्त्रे जप्त केली आहेत. यामध्ये 3 देशी बनावटीची पिस्तूल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 2 एअर गन, 405 जिवंत काडतुसे, 137 जिवंत छर्रे, 2 तलवारी, 3 लोखंडी कोयते, 1 सुरा, 2 चाकू आणि लोखंडी रॉडचा समावेश आहे. याशिवाय पोलिसांनी त्याच्याकडून 3 लाख 20 हजार रुपयांची रोकडही जप्त केली आहे. सुरेंद्र पाटील याच्यावर यापूर्वीही 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिस ठाण्यातील रिलमुळे आला होता चर्चेत
सुरेंद्र पाटील हा पहिल्यांदाच वादात सापडलेला नाही. यापूर्वी त्याने डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात चक्क एका पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून रिल तयार केली होती. त्या घटनेनंतर तो संपूर्ण राज्यात चर्चेत आला होता.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही वारंवार कायद्याला आव्हान देणाऱ्या या रिलस्टारचा शस्त्रांचा परवाना आधीच रद्द करण्यात आला होता. तरीही त्याने ही शस्त्रे कोठून आणली आणि त्याचा वापर तो कशासाठी करणार होता, याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.