Gujrat Crime : इतकी क्रूरता कुठून येते? आपलं मानसिक संतुलन खरंच बिघडलं आहे का? असा सवाल गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांमधून उपस्थित केला जात आहे. मुंबईतील मालाडमधील लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाने ३३ वर्षांच्या प्राध्यापकावर जीवघेणा हल्ला केला. यात प्राध्यापकाचा मृत्यू झाला. यानंतर गुजरातमधून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या तिघांनी एका ५० वर्षांच्या व्यक्तीची हत्या केली. शेजारच्यांमधील वाद इतक्या थराला जाणं हे खरोखरचं अस्वस्थ करणारं आहे.
गुजरातमधील गांधीधाममध्ये नेमकं काय घडलं?
ही घटना गुजरातच्या कच्छमधील गांधीधाममधून समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोटरी नगरमधील सेक्टर १४ मध्ये माहेश्वरी आणि त्यांच्या चार शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. घराबाहेरील ओट्यावर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५० वर्षीय व्यक्तीला त्याच्या शेजाऱ्यांनी जिवंत जाळलं. चारही आरोपींनी माहेश्वरी यांचा पाठलाग केला. त्यांना बाथरुममध्ये गाठलं. येथे त्यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना आग लावुन देण्यात आली. करसन माहेश्वरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एका क्षुल्लक कारणावरुन शेजारच्यांसोबत झालेल्या वादाचे हिंसाचारात रुपांतर झाले. या घटनेचा भयावह व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इतका भयंकर आहे ही तो वाचकांना दाखविता येऊ शकत नाही. गंभीररित्या भाजलेल्या माहेश्वरी यांना तातडीने भुज येथील जी.के रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली असून तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी
प्रेमिलाबेन नरेशभाई मातंग (३०)
अंजूबेन (उर्फ अजिबेन) हरेशभाई मातंग (३६)
चिमनाराम गोमाराम मारवाडी (४७)
या प्रकरणातील चौथी संशयित आरोपी मंजूबेन लाहिरीभाई माहेश्वरी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.