Haji Mastan's Daughter Haseen Mirza Seeks PM Modi's Help: एकेकाळी मुंबईत ज्याचे नाव ऐकताच लोकांच्या अंगावर काटा उभा राहायचा, तो मुंबईचा पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झाची मुलगी आज न्यायासाठी धडपडत आहे. कुख्यात दाऊद इब्राहिमने देखील ज्याच्या हाताखाली गुन्हेगारीचे धडे गिरवले, त्या मस्तान मिर्झाच्या या मुलीने आता कुटुंबाकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध आणि पतीने केलेल्या शारीरिक अत्याचाराविरुद्ध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.
हसीन मिर्झा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील भयानक अनुभव आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईची कहाणी सांगितली आहे.
जुहूचा बंगला आणि हसीन यांचा कायदेशीर संघर्ष
हसीन मिर्झा यांनी सर्वप्रथम 2016 साली कोर्टात धाव घेतली होती. हाजी मस्तान हे आपले वडील असल्याचा दावा करत, त्यांना मुंबईतील जुहू येथील बंगला मिळावा यासाठी त्यांनी याचिका दाखल केली. हसीन जेव्हा केवळ 10 वर्षांच्या होत्या, तेव्हा हाजी मस्तानचे निधन झाले. मृत्यूपूर्वी मस्तानने जुहूचा बंगला हसीनला मिळावा, असे सांगितले होते, असा त्यांचा दावा आहे.
( नक्की वाचा : Badlapur : बदलापूरच्या काँग्रेस नेत्याची हत्या झाल्याचं 3 वर्षांनी उघड, नवऱ्यानं घरात आणला होता साप आणि.... )
हाजी मस्तानच्या निधनानंतर, हसीनची आई आणि मस्तानची दुसरी पत्नी सोना मस्तानने (मूळ नाव शाहजहां बेगम) वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी हसीनचे जबरदस्तीने लग्न लावून दिले.
हसीन यांनी त्यांच्या नवऱ्यावर, नासिर हुसेनवर, बलात्कार केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. हसीन 26 वर्षांच्या असताना,नवऱ्याने त्यांना घरातून बाहेर काढले आणि जुहूचा बंगला स्वत:च्या ताब्यात घेतला, असा दावा हसीन यांनी केला आहे. आता पुन्हा एकदा जुहूच्या बंगल्याचा ताबा मिळवण्यासाठी त्या कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.
वारसा हक्कावर प्रश्नचिन्ह
हसीन मिर्झा वारंवार जुहूच्या बंगल्यासाठी आणि न्यायासाठी लढत असल्या तरी, त्या खरंच हाजी मस्तानच्या कन्या आहेत का, असा सवालही उपस्थित केला जातो. हसीन यांची आई सोना आणि हाजी मस्तान यांचा विवाह झाला होता हे सत्य आहे, आणि त्यांच्या लग्नाची कहाणी देखील खूप रंजक आहे.
( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांवर जबरदस्ती ! 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )
अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचा मुंबईत मोठा दरारा होता. राजकीय नेते असोत किंवा बॉलिवूडचे कलाकार, सगळेच त्याच्यापुढे नतमस्तक व्हायचे. मस्तानला सिनेमाचे खूप आकर्षण होते आणि अभिनेत्री मधुबाला त्याची आवडती हिरोईन होती. मधुबालाच्या सौंदर्यावर मस्तान फिदा होता. तिच्याशी लग्न करणे शक्य नसल्याने, त्याने बॉलिवूडमध्ये नव्याने आलेल्या अभिनेत्री *शाहजहां बेगमशी लग्न केले. शाहजहां बेगम हुबेहुब मधुबालासारखी दिसत असे. लग्नानंतर तिचे नाव सोना मस्तान झाले.
परंतु, सोना मस्तानने हसीन ही मस्तानची मुलगी नाही, असे वक्तव्य केल्यामुळे हसीनच्या वारसा हक्कावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वक्तव्यामुळेच हसीन यांना कोर्टात आपल्या वारसा हक्कासाठी मोठी लढाई लढावी लागत आहे.
इथे पाहा VIDEO