महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या संपूर्ण देशात ऐरणीवर आला आहे. कोलकातामध्ये महिला डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. राज्यातही बदलापूर तसंच वेगवेगळ्या भागात अल्पवयीन मुली तसंच महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघड झाल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच आंध्र प्रदेशात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण आंध्रात खळबळ उडाली आहे.
आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यात एका इंजिनियरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमधे गुप्त कॅमेरा लावण्यात आल्याचं उघड झालं आहे. हॉस्टेलमधील वॉशरुममध्ये हा कॅमेरा लावण्यात आला होता. या प्रकरणात विद्यार्थींनींनी आक्षेप घेतल्यानंतर मुलांच्या हॉस्टेलमधील एक विद्यार्थी विजयला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असून विद्यार्थीनींमध्ये भीतीचं वातावरण आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
300 पेक्षा जास्त फोटो लीक
गर्ल्स हॉस्टेलमधील 300 पेक्षा जास्त फोटो ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्याकडून खरेदी करण्यात आली आहेत. पोलिसांनी या विद्यार्थ्याचा लॅपटॉपही जप्त केलाय. या प्रकरणात काल (शुक्रवार, 29 ऑगस्ट 2024) रोजी रात्री विद्यार्थीनींनी जोरदार आंदोलन केलं. आम्हाला न्याय द्या, अशी मागणी त्यांनी केली. आता आम्हाला वॉशरुममध्ये जाण्याची भीती वाटत आहे, असंही या मुलींनी सांगितलं.
( नक्की वाचा : पुणे पोलिसांमध्ये खळबळ! आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल )
कसा लागला छडा?
हॉस्टेलमधील एका मुलीनं गुप्त कॅमेऱ्याची सूचना सर्वप्रथम कॉलेज प्रशासनाला दिली. ती मुलगी वॉशरुममध्ये गेली त्यावेळी तिला काहीतरी विचित्र वाटलं. त्यावेळी तिला तिथं व्हिडिओ कॅप्चर करणारा कॅमेरा दिसला. हे प्रकरण उघड झाल्यानंतर मुलींची सुरक्षा आणि गोपनियतेबाबत काळजी वाढली आहे. विद्यार्थीनींच्या खासगी सुरक्षेचं उल्लंघन झालं असून या व्हिडिओचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. कॉलेज प्रशासनानंही या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीसाठी पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर भविष्यात या प्रकराच्या घटना रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू करण्याचं वचनही प्रशासनानं दिलंय.