Torres च्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कधीच परत मिळणार नाही?

भाजी विकण्याचे काम करणाऱ्या या प्रदीपने 5 कोटी रुपये जमा केले आणि ते सगळे टोरेसमध्ये गुंतवले. यासाठी त्याने स्वत:कडची कमाई दिलीच शिवाय मित्रांना अधिक व्याज देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून कर्जेही घेतली.

जाहिरात
Read Time: 5 mins
मुंबई:

राहुल कांबळे,भाग्यश्री प्रधान-आचार्य

जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी 
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी 
तुकाराम महाराजांनी रचलेल्या या अभंगाचा अर्थ होतो की, "जो मनुष्य उत्तम उद्योग धंदा करून धन कमवितो आणि त्याचा विनियोग चांगला करतो त्याचं मनुष्याला उत्तम गती मिळेल .आणि तो उत्तम जन्माला येऊन पुन्हा सुख भोगेल." मुंबईत भाजी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या प्रदीप कुमार याला कदाचित तुकाराम महाराज माहिती नसावेत मात्र त्यांनी सांगितलेला मार्ग तो आचरणात आणत होता. एकेदिवशी त्याला 'टोरेस' निदर्शनास पडले आणि संत तुकाराम महाराजांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास "अरे देवा झाला असंगाशी संग | सारी मनःशांती | दूर गेली ||" अशी त्याची स्थिती झाली.

भाजी विकण्याचे काम करणाऱ्या या प्रदीपने 5 कोटी रुपये जमा केले आणि ते सगळे टोरेसमध्ये गुंतवले. यासाठी त्याने स्वत:कडची कमाई दिलीच शिवाय मित्रांना अधिक व्याज देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून कर्जेही घेतली. आता प्रदीप कुमारच्या डोक्यावर 13 कोटींचे कर्ज झाले आहे. त्याने ज्या टोरेसमध्ये पैसे गुंतवले होते त्या टोरेसच्या शोरूमला आता टाळं लागलं आहे. आकर्षक परताव्याचे आमीष दाखवणारे गायब झाले असून प्रदीप कुमार रडवेला झाला आहे. 

Advertisement

घोटाळा नेमका किती कोटींचा ?
नवी मुंबईतील टोरेस (Torres Scam) च्या शोरूमबाहेर 6 जानेवारी रोजी मोठा गोंधळ झाला. सानपाड्यातील या आलिशान शोरूमबाहेर अनेकजण जमले होते आणि ते घोषणा देत होते. काहींच्या डोळ्यात अश्रू होते. मनात प्रचंड राग होता मात्र त्यापेक्षा जास्त हतबलता जास्त होती. पुढे काय ? असा प्रश्न सगळेजण एकमेकांना विचारत होते, मात्र त्यांच्या प्रश्नाची उत्तरं कोणाकडेच नव्हती. हीच स्थिती मुंबईतील दादर, कल्याण आणि टोरेसच्या इतर शोरूमबाहेरही पाहायला मिळाली. तौफीक रियाझ आणि अभिषेक गुप्ता हे टोरेसचे संचालक होते आणि हे दोघेही आता गायब झालेत. कोणी म्हणतंय की टोरेसचा घोटाळा 500 कोटींचा आहे तर काहींचं म्हणणं आहे की हा घोटाळा 1000 कोटींचा आहे. खरा आकडा अद्याप कोणालाच कळालेला नाहीये. 

Advertisement

सुशिक्षित, सुज्ञ मंडळीही पडतात बळी
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईपेक्षा उपनगरे आणि त्याच्या आसपासचा परिसर अधिक विकसित होत गेला. नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नालासोपारा इथे मध्यमवर्गीयांची वस्ती वाढत गेली. दुर्दैवाने याच भागांमध्ये घोटाळेबाजांच्या भूलथापांना फसलेली माणसे जास्त असल्याचं दिसतंय. उदाहरण म्हणून नवी मुंबईचं घेऊ, नवी मुंबईतील अनेकांना टोरेस या कंपनीने फसवलं.  कुजबूज अशीही आहे की एका आमदाराच्या बायकोनेही टोरेसमध्ये पैसे गुंतवले होते. तिला जेव्हा परतावा मिळाला नाही तेव्हा आमदाराने टोरेसला हिसका दाखवला आणि हा सगळा प्रकार बाहेर आला. या दाव्याची कोणीही पुष्टी केलेली नाही, मात्र यापूर्वी फक्त राजकारणीच नाही तर डॉक्टर, इंजिनिअर, एनआरआय, उद्योजक, पोलीस इतकंच नाही तर न्यायाधीशांनीही काही दामदुप्पट योजनेत पैसे गुंतवल्याची उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. मात्र बदनामीच्या भीतीने हे कोणीही पुढे यायला तयार होत नाहीत ज्यामुळे घोटाळेबाजांचे फावते. 

Advertisement

महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमीष
हे घोटाळेबाज इतके धूर्त असतात की लोकांना असं काही आमीष दाखवतात की लोकं भुललीच पाहिजेत. टोरेसने सुरुवातीला गुंतवणुकीवर महिन्याला 8-12 टक्के परताव्याचे आमीष दिले नंतर हे आमीष 20 टक्क्यांपर्यंत वाढवत नेले. काही ठिकाणी तर टोरेसवाल्यांनी आठवड्याला 11 टक्के परताव्याचे आमीश दाखवले होते. लोकांना आणखी भुलवण्यासाठी ठराविक रक्कम गुंतवली तर आम्ही लकी ड्रॉ काढू आणि विजेत्याला 1 कोटींचे घर किंवा आलिशान गाडी देऊ अशा थापा मारल्या, लोकं त्यालाही भुलले. स्वकष्टाचे, कर्जाने घेतलेले पैसे लोकांनी टोरेसच्या बोडक्यावर ओतले.  11 महिने टोरेसवाले गुंतवणूकदारांना परतावा देत राहीले, लोकांचा विश्वास बसल्याने लोकांनी भरभरून गुंतवणूक केली. 6 जानेवारीला सगळ्या शोरूमला टाळे ठोकून सगळे फरार झाले.  

टोरेसने 10 हजार गुंतवले तर तुम्हाला हिरा मिळेल आणि याशिवाय 10 हजारांवर  2 हजार रुपये सवलत मिळेल असे सांगितले.  म्हणजेच 8 हजार रुपयांची गुंतवणूक आणि हिरा मिळेल असं सांगितलं. हा हिरा खोटा आहे असंही टोरेसवाल्यांनी सांगितलं. तुमचा विश्वास बसावा म्हणून आम्ही दिलेली ही भेट आहे असं सांगितलं. हिरा खोटा आहे असे तोंडावर सांगूनही भोळेभाबडे गुंतवणूकदार भुलले.

टोरेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता ही जवळपास शून्य टक्के इतकी आहे. यापूर्वीच्या अशाच घटनांवर नजर टाकल्यास आम्ही असे का म्हणतोय याची तुम्हाला कल्पना येईल. एका उदाहरणासकट आम्ही तुम्हाला ही बाब सांगतो.  2023 साली उरणमध्ये सतीश गावंड याने अशाच प्रकारे भरमसाठ परतावा देण्याचे आमीष दाखवले. लोकांना भुलवण्यासाठी त्याने उरण परिसरातील गावागावामध्ये एजंट नेमले होते. या सगळ्यांनी पोती भरून पैसे गोळा केले.  

गावंडने गुंतवणूकदारांना आमीष दाखवले होते की 50 दिवसांनंतर 40 टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं. एकेदिवशी गावंड गायब झाला. पोलिसांनी त्याला अटक केली मात्र साक्षीदारांनी त्याच्याविरोधात साक्ष दिली नाही. आपण जेलमध्ये गेलो तर तुमचे पैसे कसे मिळतील असं गावंडने सांगितलं त्यामुळे या साक्षीदारांनी त्याच्याविरोधात साक्ष दिली नाही.

अखेर गावंड जामीनावर सुटला मात्र नंतर पोलिसांनी त्याला परत अटक केली. गावंडला अटक होऊनही सगळ्या गुंतवणूकदारांना अजून त्यांचे पैसे मिळू शकलेले नाही. 

नियमानुसार एखादी कंपनी बुडाली तर त्या कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले जातात. मात्र या घोटाळेबाजांकडे कोणती संपत्तीच नसते. मिळालेले पैसे ते उडवल्याचे सांगतात किंवा कुठे आपल्याला दुसऱ्या कोणीतरी गुंडवल्याचे सांगतात. त्यामुळे अशा पाँझी स्कीममध्ये गुंतवणूकदारांना त्यांचे  पैसे परत मिळण्याची शक्यता ही जवळपास 0% असते. 

पाँझी स्कीम कशी चालते ?
जितके जास्त गुंतवणूकदार तितका मोठा घोटाळा हे याचे साधे तंत्र आहे. समजा हर्षद(काल्पनिक नाव) ने दापदुप्पट आमिषाला भुलून पैसे गुंतवले. त्यानंतर सदानंद आणि महेंद्र (काल्पनिक नावे)  या दोघांनीही तशाच पद्धतीने पैसे गुंतवले तर सदानंद आणि महेंद्रचे पैसे वापरून हर्षदला परतावा दिला जातो. सदानंद आणि महेंद्रनंतर जे पैसे गुंतवायला येतात त्यांच्या पैशातून सदानंद आणि महेंद्रला पैसे मिळत जातात. हर्षद, सदानंद आणि महेंद्र हे पैसे मिळाल्याने आणखी लोकांना या स्कीमबद्दल सांगतात. घोटाळेबाज अत्यंत आकर्षक सादरीकरण करून सगळ्यांना भुलवतात आणि त्यांच्याकडूनही पैसे काढून घेत राहतात. सुरुवातीला छोट्या छोट्या रकमा गुंतवणारे परतावा चांगला मिळायला लागल्याने मोठमोठ्या रकमा गुंतवायला लागतात. त्यावर परतावा देणं एका मर्यादेनंतर घोटाळेबाजांना शक्य नसतं, जे त्यांना आधीच माहिती असतं. ज्यामुळे मिळतील ते पैसे घ्यायचे आणि गायब व्हायचे असा प्लॅन त्यांचा आधीच ठरलेला असतो.   

महाराष्ट्र पोलिसांत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने या घोटाळ्यांबद्दल बोलताना सांगितले की, "तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी जगातील कोणतीही पोंजी स्कीम चालवणारी कंपनी पुढाकार घेणार नाही. 10 टक्क्याच्या वर कोणी परतावा देत असेल तर तो स्कॅमच असतो."

फसवणुकीपासून तुम्ही वाचू शकतास पण कसे ?
बँकेतील ठेवी, सोनं, शेअर्स, म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सुरक्षित मार्ग मानले जातात. या गुंतवणुकींवर किती परतावा मिळेल हे तुम्हाला माहिती असतं. शेअर बाजारातील उतार चढावावर तुम्हाला शेअर्स, म्युच्युअल फंडावर  किती परतावा मिळेल हे कळू शकतं. सगळा कारभार पारदर्शक असतो. या गुंतवणुकींमधील परताव्यापेक्षा 1 टक्का जरी कोणी अधिक परतावा देतो असं सांगितलं तर तो तुमची फसवणूक करतो आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे.