मेहबुब जमादार
महिला दिन साजरा होत असताना एका महिलेला तिच्या घरात घुसून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे याच रायगड जिल्ह्याच्या मंत्री आदिती तटकरे आहेत. शिवाय त्यांच्याकडेच महिला आणि बाल विकास हे खाते आहे. त्यामुळे त्यांच्याच गृह जिल्ह्यात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ज्या महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला त्या महिलेच्या पहिल्या नवऱ्याने हे कृत्य केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुर्वेश धाडवे हा माणगाव जिल्ह्यातल्या नळे फोडी या गावात राहतो. त्याचे म्हसळा तालुक्यातल्या कुडतुडी आदिवासीवाडीत राहणाऱ्या रेवा हिलम या 25 वर्षीय महिले बरोबर लग्न झाले होते. पण ते दोघे ही विभक्त राहात होते. शिवाय ती दुसऱ्या माणसाबरोबर राहात होती. त्याचा राग दुर्वेशच्या मनात होता. त्यातूनच त्याने तिला संपवण्याचा डाव रचला होता. त्यासाठी त्याने आपल्या एका साथिदाराला ही तयार केले होते. काही झाले तरी तिला जीवे मारायचे असं त्याने ठरवलं होतं.
त्यानुसार तो आपल्या गावावरून मित्रासह रेवाचा बंदोबस्त करण्यासाठी तिच्या कुडतुडी अदिवासीवाडीकडे निघाला. त्यावेळी रेवा ही घरात कपडे धुत होती. तिने घराचा दरवाजा बंद केला होता. त्या दरवाज्यावर लाथ मारून ते दोघे घरात घुसले. त्यानंतर त्यांनी तिच्या डोक्यावर लाकडाने जोरदार हल्ला केला. पुढे एकाने तिचे तोंड उशीने दाबले. त्यानंतर दुर्वेश 'थांब आता हिचा काटाच काढतो' असं म्हणत तिच्यावर स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने हल्ला केला.
त्याने तिच्या गळ्यावर दोन ते तीन वेळा स्क्रू ड्रायव्हरने वार केला. त्यामुळे तिच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या. तिथून त्या महिने त्या स्थितीत आपली कशीबशी सुटका करून घेतली. नंतर या प्रकरणी पीडित महिलेने म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार आरोपी दुर्वेश धाडवे आणि एक अज्ञात इसम विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तिच्या पहिल्या पतीला म्हणजेच धाडवे याला अटक करण्यात आली आहे. तर एक जण अजून फरार आहे.