Doctor Death Mystery: एका ज्येष्ठ महिला डॉक्टरचा मृत्यू आणि त्यानंतर त्यांच्या मागे उरलेली कोट्यवधी रुपयांची मालमत्ता यामुळे सध्या एका शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही केवळ एका मृत्यूची बातमी नसून त्यामध्ये संपत्तीचा मोह, कायदेशीर पेच आणि अनेक संशयास्पद वळणे आहेत. 81 वर्षांच्या या डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर त्यांच्या 60 कोटी रुपयांच्या बंगल्याचा वारसदार कोण? असा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मृत्यूपूर्वी काही कागदपत्रांवर सह्या झाल्या होत्या, ज्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
वाढदिवसाचा तो व्हिडिओ आणि अचानक बिघडलेली प्रकृती
हे संपूर्ण नाट्य मध्यप्रदेशातील जबलपूर शहरात घडत आहे. येथील डॉक्टर हेमलता श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर हा पेच निर्माण झालाय. या प्रकरणाची सुरुवात एका आनंदी वातावरणाने झाली होती. 12 जानेवारी रोजी या ज्येष्ठ महिला डॉक्टरने आपला 81 वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्या हसताना आणि केक कापताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत डॉक्टर सुमित जैन आणि त्यांची पत्नी प्राची जैन देखील दिसत आहेत.
मात्र, या सेलिब्रेशननंतर अवघ्या 2 दिवसांतच त्यांची प्रकृती कमालीची खालावली. 15 जानेवारीपर्यंत त्यांची अवस्था इतकी गंभीर झाली की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. याच दरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
( नक्की वाचा : IAS Officer: आधीच्या दोन्ही पत्नी IAS आणि आता तिसरीही...; 'या' बड्या सनदी अधिकाऱ्याच्या लग्नाची तुफान चर्चा )
11,000 स्क्वेअर फूट जमीन आणि 60 कोटींचे मूल्य
हा संपूर्ण वाद एका विशाल बंगल्याभोवती फिरत आहे. सुमारे 11,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीची किंमत साधारण 60 कोटी रुपये इतकी आहे. डॉक्टर सुमित जैन यांच्या दाव्यानुसार, या महिला डॉक्टरने ही जमीन स्वेच्छेने दान केली होती. आपल्या साऱ्यांच्या आणि मुलाच्या स्मृतीप्रत्यर्थ तिथे रुग्णालय उभारले जावे, अशी त्यांची इच्छा होती, असे जैन यांचे म्हणणे आहे.
मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) यावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. प्रकृती साथ देत नसताना आणि मानसिक अवस्था ठीक नसताना त्यांच्याकडून जबरदस्तीने या कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या गेल्याचा आरोप आयएमएने केला आहे.
( नक्की वाचा : Satara News: साताऱ्यातील शेतकऱ्याला 1 कोटी 80 लाखांचा गंडा,मुंबईच्या नगरसेविकेसह मंत्रालयातील 'बाबू' रडारवर! )
उच्चभ्रू वस्तीत तणावाचे वातावरण
जबलपूरमधील सर्वात महागड्या आणि उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या राईट टाऊन परिसरात हा बंगला आहे. या 81 वर्षीय ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. हेमलता श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या या बंगल्याबाहेर बाऊन्सर आणि पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. मृत्यूच्या काही काळ आधी दिलेल्या एका निवेदनात डॉ. हेमलता यांनी स्वतः सांगितले होते की, चुकीची माहिती देऊन त्यांच्याकडून दानपत्रावर सही घेण्यात आली होती.
वारसदार कोण आणि कायदेशीर पेच काय
डॉ. हेमलता श्रीवास्तव यांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत दुःखद राहिले आहे. 2022 मध्ये त्यांच्या मुलाचा, डॉ. रचित यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर डिसेंबर 2025 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांच्यानंतर या संपत्तीला कोणताही थेट वारस उरला नव्हता.
आता गायत्री मंदिर ट्रस्टने दावा केला आहे की, हेमलता यांना आपली सर्व संपत्ती ट्रस्टला दान करायची होती. दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये राहणारी त्यांची बहीण शांती मिश्रा यांनी आता या प्रकरणाचा ताबा घेतला असून कायदेशीर लढाई सुरू केली आहे.
जबलपूरचे जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह यांनी या वादावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, राईट टाऊनमधील ही मालमत्ता महापालिकेच्या लीजवर आहे, त्यामुळे ती कायदेशीररित्या कोणालाही दान करता येत नाही. डॉ. हेमलता यांनी स्वतः नंतर मालमत्ता दान करण्यास नकार दिला होता, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
सध्या हे संपूर्ण प्रकरण एसडीएम कोर्टाकडे सोपवण्यात आले असून सर्व संबंधित पक्षांचे जबाब नोंदवले जात आहेत. 9 नोव्हेंबर 2025 रोजी एका वैद्यकीय परिषदेत पूर्णपणे ठणठणीत दिसणाऱ्या डॉ. हेमलता यांचा जानेवारी 2026 मध्ये झालेला हा संशयास्पद अंत आता कायदेशीर तपासाचा विषय बनला आहे.