मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon News: मासिक पाळीत स्वयंपाक न केल्यानं सासू आणि ननंदेकडून विवाहितेची मारहाण करत हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप तिच्या माहेरच्या नातेनाईकांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील किनोद या गावात 26 वर्ष विवाहिता गायत्री ज्ञानेश्वर कोळी या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी एक मे रोजी उघड झाली होती. मात्र गायत्रीनं आत्महत्या केली नाही, तर सासू आणि 2 नणंदांनी तिला मारहाण केली. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या करत गळफास लावून लटकून देण्यात आल्याचा गंभीर आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासह मासिक पाळीत स्वयंपाक न केल्याच्या रागातून सासू आणि दोन नणंदांनी बेदम मारहाण करत तिची हत्या केल्याचा खळबळ जनक आरोपही विवाहितेच्या बहिणीसह भावाने केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील किनोद या गावात गायत्री कोळी ही 26 वर्षांची विवाहित महिला पती, सासू-सासरे आणि दोन मुलांसह राहात होती. गायत्रीचा पती ज्ञानेश्वर कोळीचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता. तर गायत्री शिवणकाम करुन कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होती. गेल्या काही महिन्यापासून गायत्रीच्या घराचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या बांधकामासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी सासू आणि पतीकडून तगादा लावून तिला सातत्याने मारहाण केली जात होती असा आरोप गायत्रीचा भाऊ सागर कोळी यांनी केला आहे.
काही दिवसापूर्वी गायत्रीच्या दोन नणंदा घरी आलेल्या होत्या. मात्र गायत्रीला मासिक पाळी आल्याने स्वयंपाक करण्यासाठी तिने नकार दिला. मासिक पाळीत केलेला स्वयंपाक सासू- सासाऱ्यांना चालत नाही म्हणून गायत्रीने स्वयंपाकास नकार दिला. यावरून सासू आणि तिच्या दोन्ही नणंदांनी तिला बेदम मारहाण केल्याचा आरोप गायत्रीची बहीण प्रियंका कोळी यांनी केला आहे.
( नक्की वाचा : क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचं सांगत लग्न ठरवलं, त्याच तरुणीनं भामट्याला पकडून दिले )
मारहाणीबाबत गायत्रीने आपल्या माहेरच्या कुटुंबियांना कळवले मात्र गायत्रीचे वडील हे सुरतमध्ये गेले होते. तिथून परत आल्यावर गायत्रीला घरी घेऊन जाईल असे सांगितले, मात्र वडील घ्यायला येण्यापूर्वीच गायत्रीची जीवन यात्रा संपली होती.
गायत्रीने स्वतःला घरात कुलून घेतल्याची माहिती तिच्या सासूने माहेरच्यांना दिली. त्यानंतर गायत्रीच्या भावासह मावशी आणि बहिणीने किनोद येथे येऊन पाहिले असता साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत गायत्री आढळून आली होती. पण गायत्रीच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा असल्याने सासू आणि नणंद यांनी तिला बेदम मारहाण करून तिचा गळा दाबून तिची हत्या करत गळफास लावून तिला लटकून दिल्याचा आरोप गायत्रीची मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे.
या प्रकरणात जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गायत्रीच्या नातेवाईकांच्या आरोपावरून आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.